मुंबई : पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नागपूर ) आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आहेत. मात्र मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास परवानगी नाही.
मात्र, या दोन्ही प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर (विशेषत: मजुरांना) जाण्याच्या परवानगी आहे. अशा परवानगीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल. सर्व पोलिस ठाण्याची माहिती एकत्र करून त्या विभागांच्या पोलीस उपआयुक्तांकडे पाठविली जाईल. अर्जाची छाननी करून नियमानुसार आणि तेथील कोविड १९ प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. कृपया अर्धवट किंवा अनाधिकृत किंवा सांगोवांगी दिल्या जाणाऱ्या माहितीवर विसंबून कोणीही धावाधाव करू नये., असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आलेले आहे.