Join us

गाडी आलिशान... पण मालक हैराण; आयात केलेल्या परदेशी वाहनाचा घोटाळा 

By मनोज गडनीस | Published: October 16, 2022 8:47 AM

यासंदर्भातील घोटाळ्याचा तपास थेट केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आला आहे. 

मनोज गडनीस,  लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : परदेशातून आलिशान गाडी मागवली. रितसर त्याचे शुल्क वगैरे भरले. मात्र, नंतर गाडीची कागदपत्रे, तसेच आयात शुल्काची पावतीच बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे येथील एका ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागला आहे. आता यासंदर्भातील घोटाळ्याचा तपास थेट केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आला आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबईतील बांधकाम व्यावसायिक अमित गुप्ता यांना एक आलिशान गाडी खरेदी करायची होती. त्यांच्या परिचयातील एका व्यक्तीने त्यांची भेट अमित चौधरी, जुबेर कुरेशी इलियास खान, आसिफ मोहम्मद कुरेशी यांच्याशी घालून दिली. या तिघांनी स्टालीन मोटार कॉर्पोरेशन या गाड्यांची खरेदी-विक्री करणाऱ्या कंपनीकडे एक आलिशान गाडी विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. गाडीचा सौदा ठरला आणि गुप्ता यांनी ६४ लाख रुपये मोजून जपानहून आयात केलेली आलिशान गाडी खरेदी केली. या गाडीचे आयात शुल्क भरल्याचेही गुप्ता यांना सांगण्यात आले. 

या व्यवहारासाठी वरील तिघांना तीन लाख रुपयांचे कमिशनही अदा झाले. मात्र, काही दिवसांनी एका तपासाच्या अनुषंगाने केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी संबंधित वाहनाचे सीमा शुल्क तसेच आयात शुल्क भरले नसल्याचे सांगत आलिशान गाडी जप्त केली. गुप्ता यांनी त्यांच्याकडील कागदपत्रे डीआरआयच्या अधिकाऱ्यांना दाखवली. मात्र, पडताळणीनंतर कागदपत्रे आणि पावत्या बनावट असल्याचे गुप्ता यांना सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे गुप्ता यांना समजल्यावर त्यांनी खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी रिट याचिका दाखल होती.

फ्रेट कनेक्शनमधील आणखी एक वाहन

विशेष म्हणजे, फ्रेट कनेक्शन इंडिया या कंपनीने जुलै २०२१ मध्ये ५० पेक्षा अधिक वाहने परदेशातून आयात केली होती. त्यांचे सीमा शुल्क व आयात शुल्क थकवित घोटाळा केल्याचा या कंपनीवर ठपका आहे. या प्रकरणात जप्त झालेली आलिशान गाडी ही त्याच घोटाळ्यातील असून डीआरआयने हे वाहन यापूर्वीच जप्त केले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :आरटीओ ऑफीस