राजकीय पक्षांच्या होर्डिंग्जवर दंड आकारा; न्यायालयात जनहित याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 10:45 AM2023-11-22T10:45:16+5:302023-11-22T10:45:42+5:30
उच्च न्यायालयात जनहित याचिका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाहने बेकायदा पार्क करणाऱ्यांकडून दंड आकारण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. त्याचप्रमाणे बेकायदा बॅनर्स, होर्डिंग्ज लावणाऱ्या राजकीय पक्षांकडून दंड वसूल करण्यासाठी तसेच त्यावर अंकुश ठेवण्यासाठीही यंत्रणा लागू करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
कुलाबा येथील रहिवासी आणि आयव्हीएफ स्पेशालिस्ट अनिरुद्ध मालपानी यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. बेकायदा कृत्य करणाऱ्यांवर दंड वसूल करण्याचे व राज्य सरकार व मुंबई महापालिकेला याबाबत एकसमान मार्गदर्शक तत्त्वे आखण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. नागरिक, पोलिस बॅनरचे फोटो घेऊन ते वेबसाइट, मोबाइल ॲपवर अपलोड करू शकतात. ज्या राजकीय पक्षाच्या नेत्याचे फोटो ‘अध्यक्ष’ म्हणून बॅनरवर लावले आहेत, त्या पक्षाच्या स्थानिक मुख्य कार्यालयात चलान पाठविण्यात यावे. त्याद्वारे बेकायदेशीर होर्डिंग्जवर अंकुश बसेल, असे डॉ. अनिरुद्ध मालपानी यांनी याचिकेत म्हटले आहे.
निवडणूक लढविण्यास बंदी घाला
बेकायदेशीर होर्डिंग्ज लावणाऱ्यांविरोधात फारच कमी लोक तक्रार करतात. त्यामुळे ते लोक कायद्याच्या कचाट्यातून सुटतात. जबाबदारी निश्चित करण्यात न आल्याने वारंवार असे घडत आहे. फारसे कोणी तक्रार करत नसल्याने कायद्याच्या धाकाचा प्रश्न येत नाही. त्यामुळे कठोर दंड आकारणे, हाच एकमेव व्यवहार्य उपाय आहे, अशी सूचना मालपानी यांनी याचिकेद्वारे केली आहे.
आतापर्यंत काय कारवाई केली ?
राजकीय पक्षांनी कितीदा बेकायदेशीर होर्डिंग्ज लावले, त्यांच्यावर कितीवेळा गुन्हे दाखल करण्यात आले आणि पालिकेने कितीवेळा व काय कारवाई केली, याची नोंदही ठेवण्याचे निर्देश सरकार व पालिकेला द्यावेत, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे.