लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हॉस्पिटलमधील बेड भरलेले आहेत. पोलिसांचे सहकार्य पूर्वीप्रमाणे मिळणे आवश्यक आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येला आळा घालण्यासाठी मुंबईत रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत नाइट कर्फ्यू लावा अशी सूचना राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. नाईट कर्फ्यूमुळे रेस्टॉरंट, बारचे नुकसान होईल, परंतु प्रामुख्याने रेस्टॉरंट, बार, पब येथील गर्दी कमी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. लहान मुलांमध्ये कोविडची लागण होऊ शकते, त्यामुळे त्यांच्यासाठी पेडियाट्रिक वॉर्ड आवश्यक आहे. तसेच लसीकरणासाठी नागरिकांना प्रवृत्त करणे व लसीकरण वाढवणे आणि सर्वांसाठी व्हॅक्सिनचे सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.