मुंबईत नाईट कर्फ्यू लावा, अभ्यासाअंती माजी आरोग्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 02:19 PM2021-03-19T14:19:27+5:302021-03-19T14:20:42+5:30
लहान मुलांमध्ये कोविडची लागण होऊ शकते,त्यामुळे त्यांच्यासाठी पेडियाट्रिक वॉर्ड आवश्यक आहे. तसेच लसीकरणासाठी नागरिकांना प्रवृत्त करणे व लसीकरण वाढवणे आणि सर्वासाठी वॅक्सिंनची सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
मनोहर कुंभेजकर
मुंबई- राजधानी मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हॉस्पिटल मधील ऑक्सीजन बेड भरलेले आहेत. पोलिसांचे सहकार्य पूर्वी प्रमाणे मिळणे आवश्यक आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येला आळा घालण्यासाठी मुंबईत रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत नाईट कर्फ्यू लावा अशी सूचना राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. नाईट कर्फ्यू मुळे रेस्टॉरंट ,बारचे नुकसान होईल, परंतू प्रामुख्याने रेस्टॉरंट, बार,प ब येथील गर्दी कमी होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार डॉ. दीपक सावंत यांनी गेले तीन चार दिवस पश्चिम उपगरातील पालिकेच्या एच पश्चिम,के पूर्व,के पश्चिम व पूर्व उपनगरातील एस व टी वॉर्ड या विभाग कार्यालयाला भेट दिली. येथील सहाय्यक आयुक्त,वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेतला, अशी माहिती डॉ.दीपक सावंत यांनी लोकमतला दिली.
लहान मुलांमध्ये कोविडची लागण होऊ शकते,त्यामुळे त्यांच्यासाठी पेडियाट्रिक वॉर्ड आवश्यक आहे. तसेच लसीकरणासाठी नागरिकांना प्रवृत्त करणे व लसीकरण वाढवणे आणि सर्वासाठी वॅक्सिंनची सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. कोरोना टेस्टिंग वाढवणे आहे. मास्क वापरणे,सोशल डिस्टनसिंग पाळणे याविषयी नागरिकांमध्ये अनुसुक्तता असून कारवाई योग्य प्रमाणात होत नाही.तसेच लग्नसमारंभासाठी पूर्व परवानगीसाठी आग्रह धरणे आवश्यक आहे. रेस्टॉरंट, बार येथील कर्मचाऱ्यांसाठी ठराविक कालावधी नंतर कोरोना टेस्टिंग करणे आवश्यक आहे. तसेच लोकल व पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये युव्ही लाईट्स वापरण्यासाठी विचार व्हावा. हा प्रयोग सिंगापूर व हॉंगकॉंग मध्ये यशस्वी झाला असून तिकडे कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याची माहिती डॉ.सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.
एच पश्चिम वॉर्ड मध्ये एक भाभा हॉस्पिटल वगळता महापालिकेतर्फे व्हेंटिलेटर व आयसीयूची सुविधा आवश्यक आहे. कोरोना रुग्णांची संख्या स्लमच्या खोताची वाडी व इमारतींमध्ये वाढत आहे. त्याप्रमाणात सर्व्हिलन्स कमी असल्याने टेस्टिंग व ट्रॅकिंग आवश्यक आहे. के .पूर्व वॉर्डमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ येत असल्याने परदेशातून येणाऱ्या प्रवाश्यांना क्वारंटाईन करून त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. के पश्चिम वॉर्ड मध्ये बेडची संख्या 416 असून 164 हून अधिक बेड भरलेले आहे.तर दि,8 मार्च ते दि,15 मार्च या काळात के पश्चिम वॉर्ड मध्ये 1007 कोविड रुग्ण आढळून आले. टी वॉर्ड मध्ये रोज 110 हुन अधिक रुग्णांची संख्या वाढत आहे. तर एस वॉर्ड मध्ये गेल्या 10 दिवसात 1000 केसेस वाढल्या आहेत.
मुलुंडच्या कोविड सेंटर मध्ये व्हेंटिलेटरची व्यवस्था पुरेशी नसल्याने त्याचा भार बिकेसी कोविड सेंटरवर पडत आहे. सदर वॉर्डचा पाहणी अहवाल आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केल्याचे डॉ.दीपक सावंत यांनी शेवटी सांगितले.