मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांवरून ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची देखील मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.
पूर्वी गँगवॉर दोन गटांमध्ये व्हायचं, आता सरकारमध्ये गँगवॉर सुरु आहे. मुख्यमंत्री स्वतः गुंडाला पोसतायत अशी माहिती आहे, त्यांनी गुंडांना दूर करायला पाहिजे. महाराष्ट्रात सध्या जे काही चाललंय, त्यावरून आपलं भविष्य ह्या गुंडांच्या हाती द्यायचं का?, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच राज्य सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. तसेच ताबडतोब निवडणुका घ्या, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
मी मुख्यमंत्री असताना ज्या वेळी पोलिसांवर आरोप झाले, त्यावेळी मी खंबीरपणे महाराष्ट्र पोलिसांसोबत उभा राहिलो होतो. जेवढे लोक आमच्या बरोबर आहेत, त्यांच्यावर एक दबाव आहे. त्यांना धमक्या दिल्या जात आहेत आणि त्यातून ह्या हत्या होत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. ‘भाजप में आओ, सब भूल जाओ‘ ही गुंडांसाठी ‘मोदी गॅरंटी’ आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असे बोलले की, श्वान गाडी खाला आला तर राजीनामा देऊ का म्हणाले. कुत्रा काय सगळ्या प्राण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही दिल्लीश्वेर समोर तुम्ही कुत्र्यासारखी शेपटी हलवतात अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
दरम्यान, अभिषेक घोसाळकरवर गोळ्या मॉरीसने चालवल्या की आणखी कुणी चालवल्या? त्या दोघांनाही मारण्याची सुपारी आणखी कुणी दिली होती का?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. "अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. मात्र ज्याने हत्या केली त्यानेही नंतर आत्महत्या केली. हे प्रकरण जेवढं दिसतंय तेवढं सोपं दिसत नाही आहे. सूड भावनेतून माणूस अत्यंत टोकाचं पाऊल उचलतो. त्याने टोकाचं पाऊल उचललं असेल तर त्याने आत्महत्या का केली हा प्रश्न राहतो. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसचा फेसबुक लाईव्हचा व्हिडीओ समोर आला. पण गोळ्या झाडतानाचं दिसतं. पण कोण झाडतंय हे दिसत नाही. मॉरिसने बॉडीगार्डच्या शस्त्रातून गोळ्या चालवल्या. त्या गोळ्या खरचं त्याने चालवल्या की आणखी कोणी चालवल्या? त्या दोघांना मारण्याची सुपारी आणखी कोणी दिली होती का हा एक मोठा प्रश्न मनात आहे" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.