Join us

मुंबईत १७ डिसेंबरपर्यंत जमावबंदी; खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 11:05 AM

मुंबई पोलिसांच्या अभियान विभागाचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे हे आदेश दिले आहेत.

मुंबई: मुंबईत येत्या काळात सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता भंग करून मानवी जीवन व मालमत्तेस धोका पोहोचविण्यात येणार असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी शहरात जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. हेच आदेश पुढे १७ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आले आहे. तसेच, ४ डिसेंबरपासून २ जानेवारीपर्यंत मुंबईत शस्त्रबंदीचे आदेशही लागू करण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांच्या अभियान विभागाचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे हे आदेश दिले आहेत. ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात पाच किंवा अधिक व्यक्तींच्या एकत्रित येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच, कोणतीही मिरवणूक आणि कोणत्याही मिरवणुकीत लाउडस्पीकर, वाद्ये, बॅण्ड वाजविण्यास आणि फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सर्व प्रकारचे विवाह समारंभ, अंत्यसंस्कार सभा आणि स्मशानभूमी दफनस्थळाच्या मार्गावर मिरवणूक, कंपन्या, क्लब, सहकारी संस्था, इतर संस्था आणि संघटनांची कायदेशीर बैठका, सामाजिक मेळावे आणि क्लब, सहकारी संस्था, इतर सोसायट्या आणि संघटना याचे सामान्य व्यवहार करण्यासाठी त्याची बैठक, चित्रपटगृहे किंवा सार्वजनिक करमणुकीच्या कोणत्याही ठिकाणी किंवा त्याभोवती चित्रपट, नाटक किंवा कार्यक्रम पाहण्याच्या उद्देशाने संमेलने, सरकारी किंवा निमशासकीय कार्य पार पाडण्यासाठी सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची कायदे, न्यायालये आणि कार्यालयामध्ये किंवा त्याभोवत लोकांचे संमेलन, शैक्षणिक उपक्रमांसाठी शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा त्याच्या आसपास संमेलने, कारखाने, दुकाने आणि आस्थापनांमध्ये सामान्य व्यापार, व्यवसाय आणि आवाहनासाठी संमेलने, इतर संमेलने आणि मिरवणुकी, ज्यांना विभागीय पोलिस उपआयुक्त आणि त्यांचे पर्यवेक्षक अधिकारी यांनी परवानगी दिली आहे, त्यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

२ जानेवारीपर्यंत आदेश लागू-

शस्त्रे, अग्निशस्त्रे, तलवारीसह विविध हत्यार वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश ४ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत लागू राहणार आहेत. तसेच, या काळात सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी, निदर्शने तसेच गाणे वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही नमूद केले.

टॅग्स :मुंबईपोलिस