मुंबई - राज्याच्या राजकारणात गत दोन वर्षांपासून अनेक भूकंप झाल्याचं दिसून आलं. त्यातच, गेल्या काही दिवसापासून काँग्रेसमधून मोठे नेते बाहेर पडत आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. चव्हाण यांचा राजीनामा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर, आज दुसऱ्याच दिवशी अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मोदींच्या कामाने मी प्रभावित झाल्याचे अशोक चव्हाण यांनी भाजपा प्रवेशानंतर म्हटलं.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आज पक्षप्रवेश मुंबईतील भाजपच्या कार्यालयात झाला. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन, हर्षवर्धन पाटील, भाजप नेते आशिष शेलार हे नेते उपस्थित होते. अशोक चव्हाण यांच्यासोबत नांदेड जिल्ह्यातील माजी आमदार अमर राजुरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी आपण काँग्रेस पक्ष सोडत असल्याचे सांगत, मला कुणावरही व्यक्तिगत टीका टिपण्णी करायची नाही. काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केले, पक्षाने मला खूपकाही दिलं. मात्र, पक्षासाठी मीही योगदान दिलं आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात पक्षाला ताकद मिळाली असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले. तसेच, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाने मी प्रभावित झालो आहे. देशाच्या विकासासाठी मोदींनी महत्त्वाच्या योजना राबवल्या असून देश विकसित भारताचे स्वप्न पाहत आहे, असे म्हणत चव्हाण यांनी मोदींच्या कामाचे कौतुक केले. तर. भाजपाकडून मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, जी जबाबदारी देण्यात येईल, त्यावर मी काम करेन, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
आदर्श निकालावरही बोलले
आदर्शचा निकाल आमच्या बाजुने लागला आहे, असे म्हणत आदर्श घोटाळा प्रकरणातील दबावामुळे हा पक्षप्रवेश नसल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.