भुजबळांना भोगावा लागलेला तुरुंगवास हे राजकीय षडयंत्र- सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2018 04:07 PM2018-05-04T16:07:04+5:302018-05-04T16:07:04+5:30
सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप
मुंबई: छगन भुजबळांना भोगावा लागलेला तुरुंगवास हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. भुजबळ यांना कोणत्याही न्यायालयानं दोषी ठरवलं नसतानाही त्यांना 2 वर्षे तुरुंगात काढावी लागली, हे अतिशय अन्यायकारक असल्याचंही भुजबळ यांनी म्हटलं. महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात असलेले महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना अखेर आज जामीन मंजूर करण्यात आला.
अवघड काळात भुजबळांच्या पाठिशी उभ्या राहिलेल्या जनतेचे सुप्रिया सुळेंनी आभार मानले. भुजबळांना जामीन मंजूर झाल्यास या प्रकरणातील साक्षीदारांवर त्यांच्याकडून दबाव आणला जाऊ शकतो, असा दावा सरकारी पक्षाकडून कोर्टात करण्यात आला होता. मात्र कोर्टानं हा युक्तीवाद अमान्य केला. यावरही सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं. 'आम्ही केंद्रात आणि राज्यात सत्तेत नाही. मग आम्ही कुठून आणि कसा काय दबाव आणणार?,' असा सवाल सुळेंनी उपस्थित केला.
१४ मार्च २०१६ रोजी छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून सातत्यानं ते जामिनासाठी प्रयत्न करत होते, पण त्यांना दिलासा मिळत नव्हता. मध्यंतरी त्यांची प्रकृतीही चांगलीच खालावली होती. ते कारण पुढे करूनही त्यांनी जामीन अर्ज केला होता. मात्र तोही नामंजूर झाला होता. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील (मनी लॉंड्रिंग) कलम ४५ अन्वये बेहिशेबी मालमत्ता जमा करणाऱ्यांना गुन्हा सिद्ध होईपर्यंत अमर्याद काळ तुरुंगात ठेवण्याची तरतूद होती. ही तरतूद सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरविली होती. ही बाब भुजबळांच्या पथ्यावर पडली.