मुंबई - बांधकाम व्यावसायिकांकडून होणारी ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी एमपीआयडी, अर्थात गुंतवणूकदारांच्या हिताचं संरक्षणाच्या कायद्यात सुधारणा करण्यात येईल. सदनिकाधारकांच्या हिताचे रक्षण करणारी तरतूद या कायद्यात केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.कांजूरमार्ग येथील एन.डी.डेव्हकॉन प्रा.लि. या बांधकाम व्यावसायिकाने घरे देण्याच्या नावाखाली लोकांकडून आगाऊ पैसे घेऊन, सात कोटी रुपयांची फसवणूक केली. ग्राहकांचे पैसे परत मिळविण्याबाबत केलेल्या कार्यवाहीबाबतचा तारांकीत प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण पावसकर यांनी मांडला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी बांधकाम व्यावसायिकांकडून लोकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी एमपीआयडी कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचे सांगितले. याशिवाय, अर्धवट बांधकाम झालेले प्रकल्पांचा रहिवाशांकडून स्वयंविकास किंवा म्हाडासारख्या संस्थांकडून सदर काम पूर्ण करण्याबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एमपीआयडी कायद्यात सुधारणा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 6:03 AM