Join us

कामगिरी सुधारा, अन्यथा श्रेणी घसरेल

By admin | Published: April 15, 2015 1:59 AM

तुमची कामगिरी सुधारा; अन्यथा, गोपनीय अहवालात तुमची श्रेणी (रेटिंग) घसरेल, अशा खरमरीत शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.

यदु जोशी - मुंबईभारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणारी स्वतंत्र यंत्रणा मुख्यमंत्री कार्यालयात सुरू होत असून, तुमची कामगिरी सुधारा; अन्यथा, गोपनीय अहवालात तुमची श्रेणी (रेटिंग) घसरेल, अशा खरमरीत शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांना प्रशासन आणि योजनांप्रति अधिकाधिक उत्तरदायी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री कार्यालयात एक चिफ मिनिस्टर ट्रान्सफॉर्मेशन आॅफिस (सीएमटीओ) सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनी सर्व सचिवांना पत्र लिहिले आहे. ‘आपल्याकडून ज्या क्षेत्रात जास्तीत जास्त चांगले काम करणे अपेक्षित आहे असे की रिझल्ट एरिया (केआरए) आणि सर्वोच्च प्राधान्य दिलेले प्रकल्प (फ्लॅगशिप प्रकल्प) पूर्णत्वाला नेण्याच्या दृष्टीने आपल्याशी समन्वय राखावे आणि आपल्याला आपले लक्ष्य साध्य करण्यास मदत व्हावी म्हणून हे कार्यालय असेल,’ असे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे. संबंधित मंत्र्यांशी आपण चर्चा करू शकता. त्यांच्या सूचनांचा समावेश करून तसेच मुख्य सचिवांच्या परवानगीने आपले केआरए निश्चित करा. केआरए आणि फ्लॅगशिप प्रकल्प विशिष्ट कालावधीत पूर्ण करण्यासाठी एक रोड मॅप तयार करा. त्याचा समावेश आपला वार्षिक गोपनीय अहवाल ज्या कामाच्या वार्षिक नियोजनाच्या आधारे तयार केला जातो त्यात करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सचिवांना दिले आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सचिवांच्या कामगिरीचे मूल्यांकन हे मुख्यमंत्र्यांनी करावयाचे आहे. त्या आधारेच मुख्यमंत्र्यांनी मूल्यांकनाची ही सूत्रे स्वत:च्या हाती घेतली आहेत. रेटिंगचे महत्त्व आयएएस अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालात त्यांना १०पैकी किती रेटिंग मिळते हे अत्यंत महत्त्वाचे असते. ८ किंवा त्यापेक्षा जास्त रेटिंग मिळणे उत्कृष्ट मानले जाते. केंद्रामध्ये प्रतिनियुक्तीवर जाणे, राज्यात पदोन्नती मिळण्याच्या दृष्टीने हे रेटिंग महत्त्वाचे मानले जाते.