उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 04:22 AM2018-07-22T04:22:52+5:302018-07-22T04:23:07+5:30
विद्यापीठाचा बृहत् आराखडा; अधिसभेमध्ये मंजूर, २१३५ सूचना प्राप्त
मुंबई : मुंबई विद्यापीठाचा पुढील पाच वर्षांसाठीचा बृहत् आराखडा शनिवारी अधिसभेच्या विशेष बैठकीत मंजूर करण्यात आला. विद्यापीठातील उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारावा या दृष्टीने यात शिफारशी आणि बदल करण्यात आले आहेत. शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२३-२४ या पाच वर्षांकरिता हा आराखडा असणार आहे.
सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार, पाच वर्षांचा बृहत आराखडा तयार करताना समाजातील विविध क्षेत्रांत कार्य करणारे
उद्योजक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, विद्यार्थी, शिक्षक, पालक, प्राचार्य, संस्थाचालक, शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी, शासकीय अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी आदींच्या सूचना आॅनलाइन तसेच आॅफलाइन सर्वेक्षण प्रश्नावलीच्या स्वरूपात मागवून घेतल्या होत्या. विद्यापीठाला एकूण २ हजार १३५ सूचना प्राप्त झाल्या. या सूचनांचे विश्लेषण करून बृहत आराखडा तयार करण्यात आला. अधिसभेच्या अनेक सदस्यांनी आपल्या सूचना बैठकीत मांडल्या.
अधिसभेच्या सदस्यांनी दिलेल्या योग्य सूचनांचा अंतर्भाव या बृहत आराखड्यामध्ये केला जाईल, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सांगितले .
आराखड्यातील महत्त्वाच्या शिफारशी
बृहत आराखड्यामध्ये जिल्हानिहाय महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मुंबई शहरात महिलांसाठी महाविद्यालय, रात्रमहाविद्यालय व दक्षिण मुंबईमध्ये विधि महाविद्यालयाची शिफारस करण्यात आलेली आहे.
मुंबई उपनगर व नवी मुंबईत औद्योगिक क्षेत्र असल्याने या क्षेत्रात महिलांसाठी महाविद्यालय, ललित कला महाविद्यालय, तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या युवकांसाठी रात्र महाविद्यालय प्रस्तावित करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यामध्ये विशेषत: कल्याणमधील ग्रामीण भागामध्ये व भिवंडी तालुक्यात विधि, आर्किटेक्चर व फार्मसी महाविद्यालय या बृहत आराखड्यामध्ये प्रस्तावित केले आहे.
रत्नागिरी हा सागरी जिल्हा असल्याने यात नेव्हल आर्किटेक्चर व मरिन इंजिनीअरिंग (शिप बिल्डिंग) व आर्किटेक्चर महाविद्यालय प्रस्तावित केलेले आहे.
सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम प्रस्तावित केलेले असून, यात हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट व ललित कला महाविद्यालयाची शिफारस करण्यात आलेली आहे.
पालघर हा आदिवासी जिल्हा असल्याने येथे उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, आवश्यक आहे. येथील वसई व पालघर सोडून इतर सर्व तालुक्यांमध्ये एक तरी महाविद्यालय सुरू करणे आवश्यक आहे. तारापूर-बोईसरमध्ये औद्योगिक क्षेत्र वाढत असल्याने येथील युवकांसाठी रात्र महाविद्यालयाची शिफारस करण्यात आलेली आहे. तसेच येथील आदिवासींची संस्कृती व विशेषत: वारली चित्रकला लक्षात ठेवून ललित कला महाविद्यालयाची शिफारस केलेली आहे.
रायगड जिल्हा हा मुंबईजवळचा आहे. त्याची वाढ वेगाने होत आहे. तसेच नवे विमानतळ व महत्त्वाचे प्रकल्प होऊ घातल्याने येथे उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण करण्यासाठी विधि महविद्यालय, रात्र महाविद्यालय, ललित कला महाविद्यालय व फार्मसी महाविद्यालय प्रस्तावित केले आहे. तसेच विद्यापीठाचे उपकेंद्र व संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात यावे, अशीही शिफारस केली आहे.