दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये सुधारणेस वाव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 03:28 AM2018-07-15T03:28:25+5:302018-07-15T03:28:55+5:30
एकीकडे दहावीच्या विविध बोर्डांच्या चढ्या निकालाच्या सातत्याने चर्चा होत असताना, दुसरीकडे राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आकलन पातळीमध्ये सुधारणा होण्याची मोठी गरज असल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
- सीमा महांगडे
मुंबई : एकीकडे दहावीच्या विविध बोर्डांच्या चढ्या निकालाच्या सातत्याने चर्चा होत असताना, दुसरीकडे राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आकलन पातळीमध्ये सुधारणा होण्याची मोठी गरज असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. याला मुंबईही अपवाद नसून, सर्वेक्षणानुसार महत्त्वाच्या ५ विषयांत मुंबई उपनगर राज्यात ३६व्या क्रमांकावर तर मुंबई शहर इंग्रजीत पहिल्या आणि गणितात १०व्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट नसणे, संकल्पनाविषयीची समज नसणे ही आकलन पातळी कमी असण्याची महत्त्वाची कारणे असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) शैक्षणिक सर्वेक्षण विभागाने देशभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आकलन पातळीविषयी भाग-२चे सर्वेक्षण नुकतेच पूर्ण केले. त्यानुसार प्रत्येक राज्याच्या जिल्ह्यांचे प्रगतिपुस्तक प्रसिद्ध केले आहे. यात हे प्रगतिपुस्तक प्रत्येक प्रकारच्या शाळेतील गणित, इंग्रजी, समाजशास्त्र, विज्ञान आणि नवीन भाषा या विषयांतील विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर आधारित आहे.
या सर्वेक्षणानुसार, राज्यातील विद्यार्थ्यांची गणित विषयातील कामगिरी अत्यंत कमी म्हणजेच ३३.५७ % तर आधुनिक भारतीय भाषांमधील कामगिरी सगळ्यांत जास्त म्हणजे ५७.३९ % इतकी आहे. विज्ञान आणि इंग्रजी विषयांनाही दहावीच्या विद्यार्थ्यांकडून अधिक पसंती देण्यात आली नसून ती कामगिरी अनुक्रमे ३४.३४ % व ३७.३ % आहे. समाजशास्त्र विषयात विद्यार्थ्यांची कामगिरी ४०.६१ % इतकी असल्याचे समोर आले आहे.
ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांची तुलना केली असता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध विषयांमध्ये राष्ट्रीय सरासरीपर्यंत पोहोचण्यात कष्ट घ्यावे लागणार आहेत. तर शहरी भागातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांपेक्षा २ ते ३ टक्क्यांनी जास्त क्षमता नोंदविली आहे. सरकारी शाळांची कामगिरी खासगी शाळांच्या तुलनेत खालावली असल्याचेही सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. मुलांचा आणि मुलींचा विचार करता ५ विषयांत मुलींची कामगिरी मुलांपेक्षा सरस आहे. राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती अनुभवायला मिळाली आहे.
।विषय प्रथम क्रमांक मुंबई उपनगर मुंबई
गणित सातारा ३६ १०
विज्ञान बीड ३६ १४
समाजशास्त्र सातारा ३६ १६
इंगजी मुंबई ३६ ०१
भारतीय भाषा सिंधुदुर्ग ३६ १७