अलिबाग : ‘रायगड जिल्ह्यातील परिवहन संदर्भातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. त्यातील होणा-या सुधारणा येत्या कालावधीत दृष्टिपथात येतील. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी अलिबाग-पनवेल मार्गावर फक्त महिलांसाठी विशेष गाडीची व्यवस्था करावी अशी मागणी महिला मंडळाने केली आहे. याबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी येथे सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होेते. त्यावेळी ते बोलत होते. रायगड जिल्ह्यातील विविध राज्य परिवहन महामंडळाच्या कामगार संघटना, महिला मंडळांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या पुढे आपापली गाऱ्हाणी मांडली.ग्रामीण भागातील स्टॅण्डमध्ये लहान बाळाला त्याच्या मातेकडून स्तनपानासाठी विशेष कक्ष उभारण्यात येणार आहे. बीओटी तत्त्वाला आता या पुढे मान्यता देण्यात येणार नाही. तसेच एसटीच्या जागा विकणार नसल्याचेही रावते यांनी स्पष्ट केले. एसटी कॅन्टीनचे पुनर्निरीक्षण करण्यात येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे महिला बचत गट स्थापन करुन संबंधित कॅन्टीन त्यांना चालविण्यास देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे एसटी स्टॅण्डमध्ये भिकाऱ्यांना भीक मागता येणार नाही. ज्यांना दानधर्म करायचा असेल त्यांच्यासाठी तेथे एक पेटी ठेवण्यात येईल. त्यात त्यांनी दानधर्म करावा. भिकाऱ्यांनी एसटी परिसरात काम करावे त्याबदल्यात त्याला दानधर्माच्या पैशातून मेहनताना दिला जाईल, अशी योजना लवकरच राबविणार असल्याचे रावते यांनी सांगितले.खासगी अवैध वाहतूक रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील. एसटी महामंडळाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी विविध संघटना आणि अधिकारी, कर्मचारी यांनीही प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांना आजारपणात तसेच वृध्दापकाळात चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी स्वतंत्र सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याच्या विचाराधीन असल्याचे रावते यांनी सांगितले. ( विशेष प्रतिनिधी)
जिल्ह्यात परिवहन सेवा सुधारणार
By admin | Published: January 12, 2015 10:19 PM