लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईमध्ये संपूर्ण स्वच्छता मोहीम टप्प्या-टप्प्याने व सातत्याने राबविण्यात येत आहे. विशेषतः मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यास या मोहिमेचा फायदा झाला आहे. रस्ते स्वच्छ धुतल्याने धूलिकण कमी होऊन हवेची गुणवत्ता सुधारली आहे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मुंबईत काही ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक ३५० वरून आता २०० पेक्षाही कमी झाला आहे. पवई, बोरिवली यासारख्या ठिकाणी हा निर्देशांक १०० पेक्षा खाली आला आहे.
संपूर्ण स्वच्छता मोहिमेत मोठ्या प्रमाणात महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी, कामगार तसेच स्थानिक नागरिकही सहभागी होतात. मोहिमेच्या निमित्ताने लहान-मोठे रस्ते, पदपथ, चौक यांच्यासह नाले, सार्वजनिक प्रसाधनगृहे आदी सर्व ठिकाणी स्वच्छता केली जाते. रस्ते धूळमुक्त करण्यासाठी पाण्याने धुण्यात येतात. तसेच राडारोडा आणि ठिकठिकाणी साचलेला कचरा हटवण्यात येतो. त्याचा परिणाम म्हणजे सार्वजनिक स्वच्छतेमध्ये मोठी सुधारणा झाली आहे, पाणी फवारणी करणाऱ्या मिस्ट मशिन्समुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण कमी झाले आहे. वांद्रे-कुर्ला संकुलसारख्या ठिकाणी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
अंतर्गत रस्त्यांच्या स्वच्छतेला प्राधान्य
मुंबईतील मुख्य रस्त्यांसोबतच अंतर्गत रस्ते स्वच्छ करण्याच्या दृष्टीने प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी पालिका प्रशासनाला केली. त्याचबरोबर नियमितपणे राबवलेल्या स्वच्छता मोहिमेचा अधिकाधिक चांगला परिणाम आगामी कालावधीत नक्कीच दिसून येईल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
ठाणे, कल्याण-डोंबिवलीतही मोहिमेला वेग
स्वच्छता मोहिमेमुळे मुंबई महानगरातील हवेची गुणवत्ता सुधारली, हे या मोहिमेचे यश दाखवणारे प्रतीक आहे. आता मुंबईसोबतच ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी अशा मुंबई प्रदेशातील आसपासच्या शहरांमध्ये स्वच्छता मोहिमेला वेग दिला जात आहे. लवकरच राज्यभरात ही मोहीम विस्तारलेली असेल, असे त्यांनी सांगितले.
मरिन ड्राइव्हवर पर्यटकांशी संवाद
रविवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी मरिन ड्राइव्ह येथील पदपथ व रस्ता स्वच्छता कामांमध्ये सहभाग घेतला. दुपारी पुन्हा मरिन ड्राइव्ह येथे भेट देऊन स्वच्छता कामे पूर्ण झाल्याची प्रत्यक्ष भेटीतून खातरजमा केली. याप्रसंगी मरिन ड्राइव्हवर आलेल्या पर्यटकांशी त्यांनी संवाद साधला. पर्यटक व स्थानिक नागरिकांनी त्यांच्यासोबत सेल्फीदेखील काढले.