मुंबई : घरासमोर मोटरसायकल पार्क केल्याच्या रागात एका तरुणावर कुटुंबीयाने पेव्हर ब्लॉकने हल्ला केला.याची तक्रार मालवणी पोलीस ठाण्यात सोमवारी करण्यात आली असून अल्पवयीन मुलीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
मालवणीत अली तलाव पुढे असलेल्या शंकर मंदिरजवळ हा प्रकार घडला. यातील जखमी तरुण रमेश अलकुंटे (३६) हा २८ जून, २०२१ रोजी त्याच्या आईसोबत संध्याकाळी सहाच्या सुमारास चिकन आणण्यासाठी गेला होता. परतल्यावर त्याने त्याची मोटरसायकल त्याच्या घरासमोर पार्क केली. तेव्हा त्याच्या गाडीचा फोटो काढणाऱ्या इटकर याला रमेशने जाब विचारला. त्यावर माझ्या जागेवर गाडी क पार्क केली? अशी विचारणा करत इटकरने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इटकरचा मुलगा सुमितने रमेशला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली तर त्याच्या १३ वर्षीय मुलीने रमेशच्या डोळ्यात मसाला फेकला. इतकेच नव्हे तर रमेशची आई कोलामा (७०) यांना इटकरचा भाऊ आनंद याने हाताने मारहाण केली. रमेशचा पुतण्या रोहित याला देखील आनंदने पेव्हरब्लॉकने जखमी केले. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून इटकर आणि त्याचा भाऊ आनंद याना अटक करण्यात आली आहे.