सुधारित : विद्यापीठाच्या दुर्लक्षामुळे नवीन परीक्षा भवनाची ही दुरवस्थाच ..... !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:13 AM2021-01-08T04:13:22+5:302021-01-08T04:13:22+5:30
इमारतीला ओसी नाही, फायर ऑडिट नाही. फर्निचरला लागली वाळवी ... लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कलिना संकुलामधील परीक्षा भवनाची ...
इमारतीला ओसी नाही, फायर ऑडिट नाही. फर्निचरला लागली वाळवी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कलिना संकुलामधील परीक्षा भवनाची इमारत मोडकळीस आली आहे. परीक्षा भवनसाठी विद्यापीठाने पर्यायी इमारत बांधली गेली. अनेक वर्षांनी काम पूर्ण होऊन जुन्या इमारतीमधील पुनर्मूल्यांकन विभाग विद्यापीठ प्रशासनाने या इमारतीमध्ये स्थलांतरित केला आहे. मात्र नवीन परीक्षा भवनातील इमारतीतील दुरवस्थेमुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. इतक्य वर्षांनीही जुन्या परीक्षा भवनातील इतर विभाग या इमारतीत सुरक्षित स्थलांतरित करण्यास विद्यापीठ सक्षम नसेल. विद्यापीठ प्रशासनाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याच्या प्रतिक्रिया सिनेट सदस्यांमधून उमटत आहेत.
कालिना संकुलामधील नवीन परीक्षा भवन इमारत संकुलातच उभारण्यात आली. मात्र गेली काही वर्षे ही इमारत विनावापर पडून होती. जुन्या परीक्षा भवनाच्या इमारतीची दुरवस्था झाली असून तातडीने परीक्षा विभाग नवीन इमारतीत स्थलांतरित करावा, अशी मागणी गेली अनेक वर्षे अधिसभेत केली जात आहे. मागणीच्या पार्श्वभूमीवर जुन्या इमारतीमधील पुनर्मूल्यांकन विभाग विद्यापीठ प्रशासनाने या इमारतीमध्ये स्थलांतरित केला आहे. परंतु या इमारतीला अद्याप भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळालेले नाही यावर सिनेट सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. इमारतीमध्ये प्रशासनाने कुलगुरू, अधिकारी यांच्या केबिन तयार केल्या आहेत. लाखो रुपयांच्या फर्निचरचे आणि सेंट्रलाइज एसीचे काम करण्यात आले. मात्र हे फर्निचर विनावापर पडण्याने त्याला वाळवी लागून खराब होऊ लागले आहे. नवीन इमारतीतील या दुरवस्थेचा खर्च कोणाकडून वसूल करणार हे विद्यापीठ प्रशासनाने जाहीर करावे, अशी मागणी सुधाकर तांबोळी यांनी केली आहे.
इमारत उभारल्यानंतर त्याचा ताबा अद्याप कंत्राटदाराने विद्यापीठाकडे दिलेला नसल्याने, प्रशासन त्याची साफसफाई, देखभाल केली जात नसल्याने नवीन इमारतीची दुरवस्था झाली आहे. लिफ्ट मधेच बंद पडत असल्याने येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे इमारतीच्या बांधकामाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच भविष्यात इमारतीमध्ये कोणती दुर्घटना झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाने निश्चित करणे गरजेचे असल्याची मागणी तांबोळी यांनी केली आहे. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासन आणि रजिस्टार विनोद पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही. नवीन परीक्षा भवनाची दुरवस्था पाहता विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी नवीन इमारत उभी राहूनही जीवाची काळजी मिटली नाही अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.