क्लीनअप मार्शल टार्गेट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असली तरी भविष्याचा विचार करत महापालिकेने उल्लेखनीय पावले उचलत त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी, घराबाहेर विनामास्क वावरणाऱ्या नागरिकांना दंड आकारण्यासाठी क्लीनअप मार्शल नियुक्त केले आहेत. दंड आकारणाऱ्या क्लीनअप मार्शललाही टार्गेट देण्यात आले आहे. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी क्लीनअप मार्शलची तारेवरची कसरत होत असून, दंड आकारल्या जाणाऱ्या व्यक्तींसोबत वादही होत असल्याचे चित्र आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयात यासाठी पथके आहेत.
कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जे मास्क लावणार नाहीत; अशांवर मुंबई महापालिकेने वेगाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईसाठी क्लीनअप मार्शलची मदत घेतली जात असून, याबाबत झालेल्या करारानुसार दंडाद्वारे प्राप्त झालेल्या रकमेतील ५० टक्के रक्कम पालिकेला क्लीनअप मार्शलची नेमणूक करणाऱ्या संस्थांना द्यावी लागत आहे. महापालिकेने संस्थांच्या माध्यमातून २४ प्रभागात मार्शल नेमले असून, कोरोना रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आणि जरुरीचे आहे हे पटवून दिले जात आहे. यासाठी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विनामास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना २०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते.
--------------------
पथकात कोण?
पथकात पर्यवेक्षक, कनिष्ठ अवेक्षक, मुकादम, उपद्रव शोधक याचबरोबर विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. क्लीनअप मार्शलही नियुक्त करण्यात आले आहेत.
--------------------
थुंकणे, मास्क न लावणे महागात
सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणाऱ्या नागरिकांची सर्वच बाजूने नाकाबंदी करण्यासाठी महापालिकेने क्लीनअप मार्शलही रस्त्यावर उतरवले आहेत. रस्त्यावर थुंकणारे व मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर या मार्शलची नजर आहे.
--------------------
कुठे आहे पहारा
मुंबईतील रेल्वे स्थानकांबाहेर, बसथांबा, बाजारपेठ अशा सार्वजनिक ठिकाणी मार्शलचा खडा पहारा आहे. यापूर्वी पालिकेने कारवाईसाठी वाहतूक पोलीस व पोलिसांची मदत घेण्यास सुरुवात केली होती.
--------------------
मास्क विनामूल्य
आर्थिक दंडाची कारवाई केल्यानंतर सोबत त्यांना एक मास्क विनामूल्य देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
--------------------
नागरिक विनामास्क पुढे जातात
मास्क नसल्यास दंड केल्यानंतर नागरिक पुन्हा विनामास्क पुढे जातात. त्यामुळे उद्दिष्टांची पूर्तता व्हावी, यासाठी मास्क मोफत दिला जात आहे. याची नोंद पावतीवर होत आहे.
--------------------
वाद होतो
अनेक वेळा मार्शल गणवेशात नसतात. अशा वेळी दंड भरावा लागत असलेली व्यक्ती वादही घालते. असे अनेक प्रसंग रेल्वे स्थानकांलगत घडतात.
--------------------
पालिकेची ताकीद
वारंवार सूचना करून व दंडात्मक कारवाईनंतरही अनेक ठिकाणी मुंबईकर मास्क न लावता फिरताना दिसत आहेत. त्यामुळे बस, टॅक्सी, कार्यालय आदी सार्वजनिक ठिकाणी विनामास्क प्रवेश नाकारण्याची ताकीद पालिकेने संबंधितांना दिली आहे.
--------------------