मुंबई, दि. 3 - बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती त्यांची पत्नी व बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी दिली आहे. दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यानं बुधवारी (2 ऑगस्ट ) दुपारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरीरातील पाणी कमी झाल्याच्या कारणामुळे दिलीप कुमार यांना हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी हलवण्यात आले होते.
94 वर्षांचे असलेले दिलीप कुमार यांच्या शरीरात पाण्याची कमतरता आणि मूत्र नलिकेत संसर्ग झाल्यानं त्यांना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये योग्य ते उपचार घेतल्यानंतर दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत बुधवारच्या तुलनेत बरीच सुधारणा झाली आहे, अशी माहिती सायरा बानो यांनी दिली.
मात्र तरी गुरुवारीदेखील त्यांना हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या निगरानीखाली ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी डिसेंबर 2016 मध्ये ताप आणि पायाला आलेली सूज यामुळे दिलीप कुमार यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दिलीप कुमार यांनी 'अंदाज', 'आन', 'मधुमति', 'देवदास', 'मुगल-ए-आजम', 'गंगा जमुना', 'क्रांति' 'कर्मा' यांसहीत अनेक सुपरहिट सिनेमा बॉलिवूडला दिले आहेत. तर 1998 साली बॉक्सऑफिसवर झळकलेल्या 'किला' सिनेमात दिलीप कुमार शेवटचे अभिनय करताना पाहायला मिळाले होते.
ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार यांना 1994 साली भारतीय सिनेमातील सर्वोच्च पुरस्कार दादा साहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तर 2015 मध्ये पद्म विभूषण या सर्वोच्च नागरिक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले.