रेल्वे प्रसाधनगृहांची होणार सुधारणा
By admin | Published: January 7, 2016 01:51 AM2016-01-07T01:51:07+5:302016-01-07T01:51:07+5:30
रेल्वे स्थानकांवर असणारी प्रसाधनगृहांची बिकट अवस्था पाहता मध्य रेल्वेने त्याचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. एक महिना ही मोहीम राबवण्यात येणार असून
मुंबई : रेल्वे स्थानकांवर असणारी प्रसाधनगृहांची बिकट अवस्था पाहता मध्य रेल्वेने त्याचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. एक महिना ही मोहीम राबवण्यात येणार असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे मेन लाइन आणि हार्बर तसेच ट्रान्स हार्बर स्थानकांवर एकूण ७0२ मुताऱ्या आणि ३५९ प्रसाधनगृहे आहेत. यातील १४ स्थानकांवरील मुताऱ्या व प्रसाधनगृहांची सिडकोकडून देखभाल केली जाते. त्याव्यतिरिक्त सर्वच प्रसाधनगृहांची देखभाल रेल्वेकडून कंत्राटी पद्धतीने करण्यात येत असून त्यात प्रसाधनगृहाच्या वापरासाठी एक रुपया आकारणीही काही ठिकाणी होत आहे. तर शौचालयासाठी दोन रुपये आकारणी केली जाते. ही आकारणी होऊनही प्रसाधनगृहे आणि मुताऱ्यांची दुरवस्थाच झाली आहे. त्यातच महिला प्रसाधनगृहांकडे दुर्लक्षच केल्याचा आरोपही केला जात आहे. प्रसाधनगृहांची अवस्था बिकट असतानाच काही ठिकाणी जादा आकारणीही होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यासाठी मध्य रेल्वे स्थानकांवरील प्रसाधनगृहे आणि मुताऱ्यांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपासून ही पाहणी केली जात असल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी सांगितले. एक महिना आढावा घेऊन त्याचा अहवाल तयार केला जाईल आणि त्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.