मुंबईतील सहा विभागांच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा; चिंता मिटली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 01:24 AM2020-05-07T01:24:01+5:302020-05-07T01:24:30+5:30

दोन जलबोगदे, पाच जलवाहिन्यांचे काम

Improving water supply in six divisions of Mumbai; Anxiety subsided | मुंबईतील सहा विभागांच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा; चिंता मिटली

मुंबईतील सहा विभागांच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा; चिंता मिटली

googlenewsNext

मुंबई : तलाव क्षेत्रात पुरेसा जलसाठा असल्याने या वर्षी मुंबईला पाण्याचे टेन्शन नाही. मात्र भविष्यात पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी चेंबूर ते वडाळा ते परळ आणि चेंबूर ते तुर्भे हे दोन जलबोगदे बांधण्यात येत आहेत. या दोन जलबोगद्यांमुळे भायखळा, कुर्ला, दक्षिण मध्य मुंबईचा काही भाग तसेच चेंबूर, गोवंडी, मानखुर्द परिसरांना दिलासा मिळणार आहे.

दररोज मुंबईला तीन हजार ८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असतो. भविष्याचे नियोजन करण्यासाठी महापालिकेने जलबोगद्यांचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार चेंबूर ते वडाळा या ९.७ कि.मी. लांबीचा व २.५ मीटर व्यासाचा जलबोगदा बांधण्याचे काम सुरू आहे. यामुळे वडाळा, शिवडी, एल्फिन्स्टन, माटुंगा या परिसरात तसेच भायखळा आणि कुर्ला येथील काही भागांमध्ये पाणीपुरवठ्यात २०२६ पर्यंत सुधारणा होणार आहे. तर चेंबूर ते तुर्भे हा ५.५ कि.मी. लांबीचा व २.५ मीटर व्यासाचा दुसरा जलबोगदाही बांधण्यात येत आहे. यामुळे २०२४ पर्यंत चेंबूर, गोवंडी, मानखुर्द या दोन विभागांबरोबरच भायखळा आणि कुर्ला येथील काही परिसरांना लाभ होणार आहे.

जलवाहिन्यांची डागडुजी
मुंबईतील जलवाहिन्या ब्रिटिशकालीन असल्याने त्यांचे आयुर्मान संपण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी सध्या पाच ठिकाणी कामे सुरू आहेत. यापैकी बाळकुम ते हजुरी पूल यादरम्यान ९० वर्षे जुन्या दोन ब्रिटिशकालीन जलवाहिन्यांना पर्याय म्हणून त्यांच्या लगत ४.५ किमी लांबीची व ३ मीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम पुढच्या वर्षी पूर्ण होईल.

हजुरी पूल ते सॅडल टनेल - यादरम्यान आणि पवई ते मरोशी यादरम्यानदेखील ९० वर्षे जुन्या प्रत्येकी दोन ब्रिटिशकालीन जलवाहिन्या आहेत. या जलवाहिन्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून नवीन जलवाहिन्या अनुक्रमे ४.९ किमी आणि ६.३ किमी अशा आहेत. २०२२ मध्ये हे काम पूर्ण होईल.

‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन
कोरोनाच्या संसर्गामुळे कामगारांच्या कामाच्या व राहण्याच्या ठिकाणी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन केले जाते आहे. दोन ठिकाणी जमिनीखाली जलबोगद्यांची कामे सुरू आहेत, त्या ठिकाणी प्रवेशद्वारावर ‘सॅनिटायझिंंग’ची सोय असणारे उपकरण बसविण्यात आले आहे. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या सर्व व्यक्तींना या उपकरणातून प्रवेश करून आत येणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्प) शिरीष दीक्षित यांनी दिली.

Web Title: Improving water supply in six divisions of Mumbai; Anxiety subsided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.