Imtiaz Jaleel: "मी औरंगाबादमध्ये जन्माला आलो अन् औरंगाबादमध्येच मरणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 08:46 AM2023-02-26T08:46:15+5:302023-02-26T08:48:25+5:30
बगिचेचं नाव बदला, विमानतळाचं नाव बदला, गावाचं नाव बदला, कुठल्यातरी शहरांचं नाव बदला, या अशा सरकारी निर्णयाला आम्ही पहिल्यापासूनच विरोध केला आहे.
मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावे बदलण्याची मागणी सुरू होती. काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला, त्यानंतर आता केंद्रानेही या नामकरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे दोन्ही शहरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, या निर्णयावर छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे नेते आणि खासदार इम्तियाज जलिल यांनी या नामांतराला आपला विरोध कायम असल्याचं म्हटलं. तसेच, हे प्रकरण कोर्टात असतानाही केंद्र सरकार निर्णय कसा काय घेऊ शकते? असा सवालही जलिल यांनी उपस्थित केला. एमआयएमच्या राष्ट्रीय मेळाव्यात मुब्रा येथे ते बोलते होते.
बगिचेचं नाव बदला, विमानतळाचं नाव बदला, गावाचं नाव बदला, कुठल्यातरी शहरांचं नाव बदला, या अशा सरकारी निर्णयाला आम्ही पहिल्यापासूनच विरोध केला आहे. तुम्ही इतिहासाची पानं फाडू शकता, तुम्ही एखादा बोर्ड काढून तो बोर्ड बदलू शकता. पण, इतिहास हा इतिहास असतो, औरंगाबाद हे एक ऐतिहासिक शहर आहे. वर्ल्ड हेरिटेड मॉन्यूमेंट आपल्या औरंगाबाद शहरातच आहे, त्यामुळेच, या नामांतराला आमचा विरोध राहिल, असे छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलिल यांनी म्हटलं. तसेच, मी औरंबादमध्ये जन्माला आलो होतो, मी औरंगाबादमध्येच मरणार, असेही त्यांनी म्हटलंय.
Mumbra, Maharashtra| Imtiaz Jaleel was an MP of Aurangabad & will remain as MP of Aurangabad. Some are jumping & dancing saying that they’ve changed name of Aurangabad. But I was born in Aurangabad & I will die in Aurangabad only : Imtiaz Jaleel, AIMIM MP pic.twitter.com/d0voxF5IUS
— ANI (@ANI) February 26, 2023
खासदार जलिल यांचे अनेक सवाल
शहराचं नामांतर केलंच आहे तर शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवण्यासाठी, विकासासाठी आता किती हजार कोटी रुपयांचं पॅकेज देणार आहात?. शहरात अनेक ठिकाणी ८-८ दिवसांनी पिण्याचं पाणी मिळतंय. नामांतर झाल्यानंतर आता दररोज पाणी मिळणार का?. माझ्या जिल्ह्यातले शेतकरी आता आत्महत्या करणार नाहीत का?. शहरातील बेरोजगारांना आता नोकऱ्या मिळणार आहेत का?, असे अनेक सवाल जलील यांनी विचारले आहेत.
केंद्र सरकारचे आभार - खैरे
माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, हे श्रेय फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. सर्वप्रथम बाळासाहेबांनीच संभाजीनगर नावाची भूमिका मांडली होती. त्यानंतर आम्ही 95 आणि 96 साली हा प्रस्ताव मान्य केला, मात्र न्यायालयात प्रकरण अडकलं. आम्ही श्रेयवादात पडणार नाही, पण आता लवकरच औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजीमहाराजांराचे नाव द्यावं हीच उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. बाळासाहेब ठाकरे यांची मागणी अनेक वर्षानंतर मान्य झाली यामुळे केंद्र सरकारचे आभार, अशी प्रतिक्रिया खैरे यांनी दिली.
दानवेंकडूनही केंद्र सरकारचे अभिनंदन आणि आभार
अंबादास दानवे म्हणाले की, 9 मे 1988 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर या नावाची घोषणा केली होती. दोन वेळा शिवसेनेच्या महापौरांनी महानगरपालिकेकडून हा प्रस्तावही पाठवला होता, मात्र याकडे कोणीही लक्ष दिले नाही. मविआचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला मान्य केलं. याबद्दल मी केंद्र सरकारचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो.