Maharashtra Politics: गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना पक्षनाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. यानंतर ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार हल्लाबोल केला. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. या शिवसैनिकांमध्ये जाऊन उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला आव्हान दिले. या शिवसैनिकांमध्ये ८५ वर्षांच्या आज्जींनी हजेरी लावत उद्धव ठाकरेंना पाठिंबा असल्याचे ठामपणे सांगितले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शेकडो शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमले होते. यात एक ८५ वर्षांच्या ज्येष्ठ आज्जीबाई सहभागी झाल्या होत्या. धनुष्यबाण त्यांना मिळणार नाही. धनुष्यबाण आमच्या साहेबांचाच आहे. मुंबई आमच्या साहेबांचीच आहे. धनुष्यबाण त्यांना मिळू शकत नाही, आम्ही साहेबांची साथ सोडणार नाही, असे सांगत या आज्जीबाईंनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. यापूर्वीही अनेकदा या आज्जीबाईंनी मातोश्रीसमोर येऊन शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शवत शिंदे गटावर टीका केली आहे.
Next PM उद्धव बाळासाहेब ठाकरे, एकच ध्यास, हुकुमशाहीचा सर्वनाश
मात्र, यावेळी या आज्जीबाईंनी हातात घेतलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले. या आज्जीबाईंनी एक बॅनर हातात घेतला होता. त्यावर, ‘सरकार २०२४... Next PM उद्धव बाळासाहेब ठाकरे, एकच ध्यास, हुकुमशाहीचा सर्वनाश’, असे लिहिलेले होते. उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं..., अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी महिला शिवसैनिकांचा सहभागही मोठ्या प्रमाणवर होता. दुसरीकडे, तुम्ही ज्यापद्धतीने धनुष्यबाण चोरला आहे ना...त्या चोरांना माझे आव्हान आहे. तुम्ही धनुष्याबाण घेऊन या... मी मशाल घेऊन येतो. होऊ द्या निवडणूक, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले.
दरम्यान, शिवसैनिकांना संबोधित करण्यासाठी उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबियांसह बाहेर आले आणि ओपन कारमधून भाषण केले. यावेळी शिवधनुष्य चोरीला गेलेय. निवडणुकीत गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिला. शिवसेना संपवण्याचे काम सुरु आहे. मात्र शिवसेना संपवता येणार नाही. धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो, असे म्हणत आता लढाई सुरु झालीय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"