Maharashtra Vidhan Sabha 2024: मुंबईतील २४ मतदारसंघांत महिलांचा 'मत'टक्का पुरुषांपेक्षा जास्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 11:18 AM2024-11-22T11:18:40+5:302024-11-22T11:19:58+5:30
कुलाबा विधानसभा मतदारसंघात पुरुषांपेक्षा ५.१५ टक्क्यांहून अधिक, तर अणुशक्तीनगरमध्ये ३.१० टक्क्यांहून अधिक महिलांनी मतदान केल्याची नोंद झाली आहे.
मुंबई : परीक्षांसह सर्वच क्षेत्रात आपला ‘टक्का’ वाढवत चाललेल्या महिलांनी आता मतदानातही आपली घोडदौडही सिद्ध केली आहे. मुंबईतील ३६ पैकी २४ मतदारसंघांत महिलांच्या मतदानाची टक्केवारी पुरुषांच्या तुलनेत अधिक झाली असून, महिलांचा हा वाढता टक्का कोणाच्या पारड्यात जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यामध्ये कुलाबा मतदारसंघात महिलांच्या मतदानात सर्वाधिक ५.१५ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात एकूण ५५.४६ टक्के मतदान झाले असून यंदा एकूण मतदारांच्या तुलनेत ५५.०७ टक्के पुरुष, ५५.९२ टक्के महिला, तर ३१.९८ टक्के तृतीयपंथीयांनी मतदान केले आहे.
अणुशक्तीनगर, कुलाब्यातही आघाडी
मुंबईतील १२ विधानसभा मतदारसंघांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मतदानाचे प्रमाण १ टक्क्याहून अधिक राहिले आहे. त्यामध्ये मागाठाणे, दिंडोशी, चांदिवली, मानखुर्द शिवाजीनगर, अनुशक्तीनगर, कुर्ला, वांद्रे पश्चिम, धारावी, सायन कोळीवाडा, वरळी, शिवडी, कुलाबा या मतदारसंघांचा समावेश आहे.
यातील कुलाबा विधानसभा मतदारसंघात पुरुषांपेक्षा ५.१५ टक्क्यांहून अधिक, तर अणुशक्तीनगरमध्ये ३.१० टक्क्यांहून अधिक महिलांनी मतदान केल्याची नोंद झाली आहे.