मुंबईतील ५०० उद्यानांमध्ये पक्ष्यांनाही मिळतोय थंडावा, उष्णतेवर मात करण्यासाठी उपाययोजना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 10:58 AM2024-05-01T10:58:23+5:302024-05-01T10:59:18+5:30
मुंबईत दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने पक्षांनाही मोठा त्रास होत आहे.
मुंबई :मुंबईत दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने पक्षांनाही मोठा त्रास होत आहे. तो लक्षात घेऊन पालिकेच्या उद्यान विभागाने मुंबईतील ५०० हून अधिक उद्यानांमध्ये पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. परिणामी, उद्यानांमध्ये येणाऱ्या पक्षांच्या संख्येतही वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
मागील काही दिवसांत तापमान वाढीमुळे अंगाची लाही लाही होत आहे. पशू-पक्षांनाही उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. पक्षांची तहान भागवण्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाने पुढाकार घेतला आहे. पालिकेच्या 'के पश्चिम' विभागातील एकूण ५४ उद्यानांमध्ये पाण्याने भरलेली भांडी ठेवण्यात आली आहेत. तसेच, मुंबईतील इतर ५०० हून अधिक उद्यानांमध्ये देखील प्रत्येकी दोन भांड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
दिवसातून तीन वेळा बदलतात पाणी-
१) या भांड्यांतील पाणी दिवसातून किमान तीन वेळा बदलले जात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
२) महापालिकेच्या उद्यानविभागातर्फे दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. मात्र, यंदामार्चपासूनच या उपक्रमाची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे, अशी माहिती उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.