मुंबई : विमानतळावर सहप्रवाशांशी वाद घातल्यानंतर एका महिलेला विमान प्रवासाची बंदी घालण्यात आली. मात्र, यामुळे चिडलेल्या या महिला प्रवाशाने विमान कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या हाताचा चावा घेत विमान प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी या महिलेला विमानात प्रवेश करण्यापासून रोखतानाच तिला पोलिसांच्या हवाली केले आहे. ही घटना बुधवारी लखनौहून मुंबईला येणाऱ्या अकासा एअर कंपनीच्या विमानात घडली.
लखनौहून मुंबईत येण्याकरिता ही महिला लखनौ विमानतळावर पोहोचली. विमानात प्रवेश सुरू होतेवेळी या महिलेचे काही सहप्रवाशांशी भांडण झाले. या सहप्रवाशांनी या महिलेची तक्रार विमान कंपनीच्या सुरक्षारक्षकांकडे केली. त्यानंतर या महिलेला त्या विमानाने प्रवास करता येणार नाही, असे सांगण्यात आले.
मात्र, यामुळे संतप्त झालेल्या या महिलेने विमान कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या हाताचा चावा घेतला. यानंतर तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या महिलेची मानसिक स्थिती चांगली नसल्याची प्राथमिक प्रतिक्रिया लखनौ पोलिसांनी दिली आहे. तसेच, तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या मानसिक स्थितीसंदर्भात पोलीस अधिक माहिती घेत आहेत.