भाजपाच्या राज्यातील यादीत ८ जण राजकीय कुटुंबातले; अष्टकामुळे घराणेशाहीची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 06:14 AM2024-03-15T06:14:45+5:302024-03-15T06:15:08+5:30
भाजपने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील २० लोकसभा उमेदवारांपैकी ८ जण राजकीय कुटुंबातील असून, घराणेशाहीला दूर ठेवण्याचे धोरण असलेल्या पक्षाला उमेदवारांबाबत त्यापासून दूर राहता आलेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भाजपने बुधवारी जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील २० लोकसभा उमेदवारांपैकी आठ जण हे राजकीय कुटुंबातील आहेत. या उमेदवारांपैकी बहुतेक जण हे राजकारणात गेल्या १५-२० वर्षांत स्थिरावले असले तरी त्यांना राजकीय कुटुंबाची पार्श्वभूमी आहे. घराणेशाहीला दूर ठेवण्याचे धोरण असलेल्या भाजपला उमेदवारांबाबत त्यापासून दूर राहता आलेले नाही.
रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे या माजीमंत्री आणि आता राष्ट्रवादीत असलेले एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. पहिल्यांदाच लोकसभेसाठी भाग्य अजमावत असलेल्या पंकजा मुंडे या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत. महाराष्ट्रात मंत्री होत्या. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा चालवत आहेत. अहमदनगरचे उमेदवार सुजय विखे हे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र आहेत. नंदुरबारच्या उमेदवार व विद्यमान खा. डाॅ. हीना गावित या राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत. त्यांच्या कन्या डॉ. सुप्रिया गावित या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष आहेत.
कुटुंब राजकारणात
दिंडोरीच्या उमेदवार व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या माजी मंत्री दिवंगत ए. टी. पवार यांच्या सून आहेत. अकोल्यात संधी मिळालेले अनुप धोत्रे हे माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे पुत्र आहेत. पहिल्यांदाच लोकसभा लढत आहेत. माढाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे वडील हिंदुराव नाईक निंबाळकर हे शिवसेनेचे खासदार होते. धुळ्याचे डॉ. सुभाष भामरे केंद्रात राज्यमंत्री राहिले आहेत. त्यांचे वडील काँग्रेसचे मोठे नेते व जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. डॉ. भामरे यांच्या आई गोजराबाई भांबरे या १९७२ मध्ये काँग्रेसच्या आमदार होत्या. जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ यांचे पती दिवंगत उदय वाघ हे जिल्हा भाजपचे दोनवेळा अध्यक्ष राहिले. स्मिता यांचा प्रवास मात्र कार्यकर्त्यापासून सुरू झाला.
उत्तर मुंबईचे उमेदवार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे वडील वेदप्रकाश गोयल हे वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. तसेच आई चंद्रकांता गोयल माटुंगा मुंबई येथे तीन वेळा आमदार होत्या.