निकाल जाहीर करण्यास विलंब झाला, तर कुलगुरू जबाबदार - राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 04:27 PM2023-05-16T16:27:23+5:302023-05-16T16:28:08+5:30

राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील काही पारंपरिक, कृषी, आरोग्य विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंची  बैठक सोमवारी राजभवन येथे संपन्न झाली.

In case of delay in declaration of result, Vice-Chancellor responsible says Governor | निकाल जाहीर करण्यास विलंब झाला, तर कुलगुरू जबाबदार - राज्यपाल

निकाल जाहीर करण्यास विलंब झाला, तर कुलगुरू जबाबदार - राज्यपाल

googlenewsNext

मुंबई : विद्यापीठाच्या विविध परीक्षांचे निकाल तीस दिवसांत आणि उशिरात उशिरा ४५ दिवसांच्या आत लावण्याचे बंधन असतानाही बहुसंख्य विद्यापीठे निकाल लावण्यास अक्षम्य विलंब करीत आहेत.  विद्यापीठांच्या निकालासोबत विद्यार्थ्यांचे भवितव्य निगडित असल्याने सर्व विद्यापीठांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेणे आवश्यक आहे असे सांगून यानंतर निकाल लावण्यास विलंब झाल्यास थेट कुलगुरूंना जबाबदार धरले जाईल, असे  राज्यपाल रमेश बैस यांनी  राज्यातील कुलगुरूंना सांगितले.  

राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील काही पारंपरिक, कृषी, आरोग्य विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंची  बैठक सोमवारी राजभवन येथे संपन्न झाली. आगामी २०२३-२४ शैक्षणिक सत्रापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात विद्यापीठांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी, तसेच विद्यापीठांशी निगडित सामायिक विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
याच विषयावर राज्यातील उर्वरित विद्यापीठांची दुसरी बैठक नागपूर येथे घेणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले. नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी उणापुरा एक-दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. धोरणाच्या उत्तम अंमलबजावणीबाबत महाराष्ट्राने देशापुढे उदाहरण सादर करावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.  
काही दिवसांपूर्वी २०० विद्यार्थ्यांना एका विषयात चुकून शून्य गुण मिळाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. अशा चुका टाळल्या पाहिजेत व चूक झाल्यास विद्यार्थ्यांना त्वरित दिलासा दिला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.    
बैठकीच्या सुरुवातीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत आढावा सादर केला, तसेच १८ उद्दिष्टपूर्तीबाबत (की रिझल्ट एरियाज)  अद्ययावत माहिती दिली.

विद्यापीठांनी संवेदनशीलतेने पाहावे
- वेगवेगळ्या परीक्षांचे निकाल वेळेवर न लागल्यामुळे सामाईक शैक्षणिक वेळापत्रक चुकते.  त्यामुळे निकाल वेळेवर लावले पाहिजेत, तसेच गुणपत्रिकांचेही वितरण वेळेवर झाले पाहिजे.
- अनेकदा इतर विद्यापीठांमध्ये किंवा परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची किंवा तात्पुरत्या पदवी प्रमाणपत्राची गरज असते. 

विद्यापीठांकडून प्रतिसाद न मिळाल्याने असे विद्यार्थी आपणास लिहितात.  विद्यार्थ्यांच्या समस्येकडे विद्यापीठांनी संवेदनशीलतेने पाहावे, असे राज्यपालांनी सांगितले.
 

Web Title: In case of delay in declaration of result, Vice-Chancellor responsible says Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.