'सी. आर. व्यास वंदना'मध्ये भुवनेश कोमकली, पं. सुरेश बापट आणि वसीम खान यांचे गायन

By संजय घावरे | Published: January 3, 2024 08:55 PM2024-01-03T20:55:38+5:302024-01-03T20:55:56+5:30

९ व १० जानेवारीला वीर सावरकर सभागृहात रंगणार दोन दिवसीय संगीत मैफिल

In 'CR Vyas Vandana, Vocals by Bhuvanesh komkali Pt. Suresh Bapat and Wasim Khan | 'सी. आर. व्यास वंदना'मध्ये भुवनेश कोमकली, पं. सुरेश बापट आणि वसीम खान यांचे गायन

'सी. आर. व्यास वंदना'मध्ये भुवनेश कोमकली, पं. सुरेश बापट आणि वसीम खान यांचे गायन

मुंबई - दरवर्षीप्रमाणे यंदाही शास्त्रीय गायक आणि रचनाकार पंडित सी. आर. व्यास यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'सी. आर. व्यास वंदना' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यास यांच्या २२ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात भुवनेश कोमकली, पं. सुरेश बापट आणि वसीम अहमद खान यांची मैफल रंगणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.

९  आणि १०  जानेवारीला शिवाजी पार्क येथील वीर सावरकर सभागृहामध्ये सायंकाळी ७ वाजता 'सी. आर. व्यास वंदना' कार्यक्रम सादर होणार आहे. यात पं. कुमार गंधर्व यांचे नातू पं. भुवनेश कोमकली, तसेच ग्वालियर घराण्याचे पं. सुरेश बापट आणि आग्रा घराण्याचे उस्ताद वसीम अहमद खान यांचे गायन, त्याचप्रमाणे बनारस घराण्याचे ज्येष्ठ तबला वादक पं. शारदा सहाय यांचे पुत्र संजू सहाय आपली कला सादर करणार आहेत. कार्यक्रमाची  सुरुवात पं. भुवनेश कोमकली यांच्या गायनाने होणार आहे. कोमकली यांनी जवळपास संपूर्ण भारतातील नामांकित संगीत महोत्सवांमध्ये सादरीकरण केले आहे. या कार्यक्रमात त्यांना तबल्यावर मंदार पुराणिक आणि संवादिनीवर अनंत जोशी साथ करणार आहेत. त्यानंतर आग्रा घराण्याचे गायक उस्ताद वसीम अहमद खान यांचे सादरीकरण होईल. खान हे आग्रा घराण्याचे आणखी एक सूत्रधार, ज्यांनी या शैलीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे अशा बशीर खान यांचे पुत्र असून, त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून, त्यांचे आजोबा स्वर्गीय अता हुसेन खान यांच्याकडून तालीम घेतली आहे. त्यांना तबल्यावर स्वप्नील भिसे आणि संवादिनीवर सुधांशु घारपुरे साथ करणार आहेत.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात प्रख्यात तबला वादक संजू सहाय यांच्या नादमय तबला वादनाने होईल. संजू सहाय यांना 'विष्णू' म्हणूनही ओळखले जाते, सध्या सर्वोत्कृष्ट तबला वादकांपैकी ते एक आहेत. बनारस घराण्याचे संस्थापक पं. राम सहाय यांचे ते वंशज आहेत. सहाय हे या घराण्यातील तबलावादकांची सहावी पिढी आहे. ते ऑल इंडिया रेडिओचे ए ग्रेड कलाकार आहेत. या कार्यक्रमात त्यांना सारंगीवर साबिर खानची साथ लाभणार आहे. कार्यक्रमाची सांगता सुरेश बापट यांच्या गायनाने होईल. बापट यांनी वयाच्या आठव्या वर्षी लीला शेलार, भास्करराव फाटक आणि वाय. टी. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानी शास्त्रीय गायन संगीताचे प्रशिक्षण सुरू केले. ते किराणा घराण्याचे गायक फिरोज दस्तूर यांचे ज्येष्ठ शिष्य ए. के. अभ्यंकर यांचे शिष्य आहेत. गायक प्रभाकर कारेकर आणि ग्वाल्हेर  घराण्याचे डॉ. अशोक रानडे यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. त्यांना तबल्यावर स्वप्नील भिसे आणि संवादिनीवर अनंत जोशी साथ करणार आहेत.

Web Title: In 'CR Vyas Vandana, Vocals by Bhuvanesh komkali Pt. Suresh Bapat and Wasim Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई