"दिवाळीत फटाक्यांचा आवाज आला पण, धनंजय मुंडेंचा आवाज आलाच नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 02:22 PM2023-11-28T14:22:31+5:302023-11-28T14:23:20+5:30
आपलं घर सोडून दुसऱ्याच्या दारात गेले आहेत, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली.
मुंबई - राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना दुसरीकडे यंदा पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाअभावी खरीप वाया गेला, तर आता रब्बीच्या हंगामात अवकाळी पावसाचे संकट बळीराजावर ओढावले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्यातला शेतकरी डोळ्यात अश्रू आणून बसला आहे. मात्र, स्वत:ला गरीब शेतकऱ्याचा मुलगा म्हणणारे मुख्यमंत्री तेलंगणात गेले आहेत. आपलं घर सोडून दुसऱ्याच्या दारात गेले आहेत, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली.
शेतकऱ्यांवर अवकाळी संकट ओढवलं असून अद्यापही पिक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. तर, काही शेतकऱ्यांना केवळ २० रुपयांचा चेक मिळाल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा न झाल्यास मी दिवाळी साजरी करणार नाही, असे धनंजय मुंडेंनी म्हटले होते. उद्धव ठाकरेंनी धनंजय मुंडेंच्या या विधानाची आठवण करुन देत, शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याचे पैसे का मिळाले नाहीत, असा सवाल केला. तसेच, दिवाळीत फटाक्यांचे आवाज ऐकू आले, पण कृषीमंत्र्यांचा आवाज ऐकू आला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
हे राज्याला न्याय देऊ शकत नाही. pic.twitter.com/qNTMOjXWQe
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 28, 2023
राज्यातील शेतकरी संकटात असताना दुष्काळग्रस्त भागातील पंचनामे झाले आहेत की नाही, पीक विम्याचे पैसे किती शेतकऱ्यांना दिले गेले, नुकसानीचे पैसे तुम्ही कधी देणार, असा सवालही शेतकऱ्यांनी विचारला आहे. तसेच, कृषीमंत्री म्हणाले की मी वस्तुनिष्ठ माहिती घेऊन पंचनामे करू. पण, ज्याची निष्ठाच कोणावर नाही, तो वस्तुनिष्ठ माहिती घेऊन काय करणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. आपल्या पत्रकार परिषदेतून राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न विचारत राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांना लक्ष्य केले.
ज्यांची कोणावर निष्ठा नाही ते वस्तुनिष्ठ माहिती काय घेणार? pic.twitter.com/VV2il4AOnT
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 28, 2023