मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार सध्या युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून राज्यातील अनेक जिल्ह्यात सरकारविरुद्ध आवाज उठवत आहेत. मात्र, त्यांच्या युवा संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळत नसल्याची टीका त्यांच्या विरोधकांकडून केली जात आहे. त्यास विविध ठिकाणी मिळत असलेल्या प्रतिसादाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत रोहित पवार उत्तर देत आहेत. तसेच, युवा संघर्ष यात्रेत तरुणाईसह विविध क्षेत्रातील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून सरकारला प्रश्न विचारत आहेत. सरकारवर जोरदार टीकाही करताना ते दिसून येतात.
राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं असून ओबीसी आणि मराठा यांच्यात शाब्दीक हल्लाबोल पाहायला मिळत आहे. त्यातच, आमदार रोहित पवार यांनी इतिहासाचा दाखला देत मराठेशाहीचा उल्लेख करत सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. रोहित यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन युवा संघर्ष यात्रेचा उल्लेख करत कोणाचेही नाव न घेता अनाजी पंत म्हणत सत्ताधारी नेत्यांवर निशाणा साधला. रोहित पवार यांच्या ट्विटचा अर्थ लक्षात घेऊन भाजप समर्थकांनी त्यांच्यावर पलटवारही केला आहे.
युवा संघर्ष यात्रेत साडे चारशे किमी पायी चालल्यानंतर एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पूर्वीच्या काळात मराठेशाही एका 'अनाजी पंत' ने संपवली आताच्या काळामध्ये 'महाराष्ट्र-धर्म' संपवण्याचे काम एक आधुनिक 'अनाजी पंत' करत आहेत, असे म्हणत रोहित पवार यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आमदार पवार यांच्या ट्विटला भाजपा आणि फडणवीस समर्थकांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही आजोबांच्या पाऊलावर पाऊल टाकत आहात, जातीय राजकारण करत आहात, असे काहींनी म्हटलं आहे. तर, तुमच्या युवा संघर्ष यात्रेला कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने जाणीवपूर्वक असे विधान करत तुम्ही लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहात, असेही एका युजर्संने म्हटले आहे.
नियुक्तीवरुनही कृषीमंत्र्यांना केलं होतं लक्ष्य
भविष्याचं स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील उमेदवारांनी कष्टाने राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण केली. २०३ उमेदवार परिक्षेअंती निवडीस पात्रही ठरले आहेत. या उमेदवारांची नियुक्ती ही कृषी उपसंचालक तसेच, मंडळ व तालुका कृषी अधिकारी पदावर करण्यात आली. मात्र, अद्यापही उमेदवारांना नियुक्ती न मिळाल्याने उमेदवारांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. आता, आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांना टॅग करत याप्रकरणी विचारणा केली आहे.