ईडी ॲक्शन मोडमध्ये!, जुलैच्या पहिल्या दहा दिवसांतच १२७० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त 

By मनोज गडनीस | Published: July 13, 2022 08:07 AM2022-07-13T08:07:12+5:302022-07-13T08:07:20+5:30

वर्षभरातील सर्वांत मोठी कारवाई, चिनी कंपन्यांची सर्वाधिक मालमत्ता 

In ED action mode assets worth Rs 1270 crore were seized in the first ten days of July Chinese companies on radar | ईडी ॲक्शन मोडमध्ये!, जुलैच्या पहिल्या दहा दिवसांतच १२७० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त 

ईडी ॲक्शन मोडमध्ये!, जुलैच्या पहिल्या दहा दिवसांतच १२७० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त 

googlenewsNext

मनोज गडनीस
मुंबई : देशातील सर्वांत प्रभावी तपास यंत्रणा असा लौकिक अलीकडच्या काळात प्राप्त झालेल्या ईडीने (सक्तवसुली संचालनालय) जुलै २०२२ या महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत तब्बल १२७० कोटी ७१ लाख रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. ईडीने चालू वर्षात केलेली ही सर्वांत मोठी कामगिरी मानली जात आहे.

ईडीने जुलै महिन्यात केलेल्या कारवायांपैकी ॲम्नस्टी इंटरनॅशनल या संस्थेवरील कारवाई वगळता अन्य सर्व कारवाया या मनी लाँड्रिंग कायद्याखाली केल्या आहेत. यातही ९ पैकी ४ प्रकरणांमध्ये झालेल्या कारवायांमध्ये सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झालेल्या प्रकरणांचा समावेश आहे. मूळच्या रत्नागिरीच्या असलेल्या सचिन नाईक नावाच्या व्यक्तीने बंगळुरू येथे १० हजार २९९ लोकांची फसवणूक करत ७२२ कोटी रुपयांची माया गोळा केली होती. लोकांना परवडणाऱ्या घरातील दरांचे आमिष दाखवून सामान्य लोकांकडून पैसे घेण्यात आले होते. ४ जुलै रोजी जप्तीची कारवाई केलेल्या या प्रकरणात ईडीने १३७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. 

११ जुलै रोजी केलेल्या कारवाईत देशभरातील हजारो लोकांना बनावट क्रिप्टो करन्सी चलन देण्याच्या मोबदल्यात मोठी माया गोळा केलेल्या कंपनीवर कारवाई करण्यात आली होती, तर अन्य प्रकरणांत कंपन्यांनी मुदतठेवी स्वीकारत किंवा कर्ज घेतले. मात्र, त्याचा विनियोग मूळ उद्देशाकरिता न करता ते पैसे बनावट कंपन्या स्थापन करून त्यात वळवत त्या पैशाचा वैयक्तिक वापरासाठी वापर केल्याचे तपासात दिसून आले.

वसुलीपेक्षा भाडे जास्त
गेल्या काही वर्षांत ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही प्रकरणांत वाहनांची जप्ती केली होती. त्या वाहनांना ठेवण्यासाठी जागादेखील भाडेतत्त्वावर घेण्यात आली. मात्र, संबंधित प्रकरण किमान दहा वर्षे चालले. यानंतर ती वाहने अक्षरशः भंगार झाली. त्यामुळे त्यांच्या लिलावातून फारच किरकोळ रक्कम मिळाली. मात्र, त्या तुलनेत भाड्यापोटी लाखो रुपये खर्च झाले होते.

चिनी कंपन्या रडारवर
भारतामध्ये व्यवसाय करणाऱ्या चिनी कंपन्या अवैधरीत्या मोठ्या प्रमाणावर पैसे चीनमध्ये पाठवत असल्याची माहिती पुढे आल्यानंतर आता या चिनी कंपन्या ईडीच्या रडारवर आल्या आहेत. 

गेल्या महिन्यात ईडीने शाओमी या मोबाईल हँडसेट कंपनीवर कारवाई करत त्यांची मालमत्ता जप्त केली होती. व्हिवो कंपनीची ४६५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने ७ जुलै रोजी जप्त केली. या दहा दिवसांतील ईडीने जप्त केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे. 

तारीख     जप्तीचे तपशील 
११ जुलै १४ कोटी
८ जुलै     ४५ कोटी ५० लाख
७ जुलै     ४६५ कोटी
६ जुलै     ८६ कोटी ६५ लाख
४ जुलै     १३७ कोटी ६० लाख 
२ जुलै     २४३ कोटी ७५ लाख
२ जुलै     ९६ कोटी २१ लाख
२ जुलै     १७३ कोटी ४८ लाख
२ जुलै     ८ कोटी ५२ लाख 
एकूण     १२७० कोटी ७१ लाख 

Web Title: In ED action mode assets worth Rs 1270 crore were seized in the first ten days of July Chinese companies on radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.