Join us  

असा रचला सापळा... १०० कोटींच्या बदल्यात खासदारकी, राज्यपालपद!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 9:03 AM

लातूर जिल्ह्यातील नांदुर्गा येथील रहिवासी असलेला कमलाकर बंडगर हा दिल्लीत सीबीआयचा वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी करत अनेकांना गंडा घालत होता

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : १०० कोटींच्या मोबदल्यात राज्यात मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवल्याप्रकरणी एका टोळीला ताब्यात घेतल्याचा प्रकार ताजा असतानाच आता १०० कोटी रुपयांच्या मोबदल्यात राज्यसभेची खासदारकी वा राज्यपालपद मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केला आहे. याप्रकरणी महाराष्ट्रासह नवी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांत छापे टाकत सीबीआयने चौघांना अटक केली. टोळीचा सूत्रधार मूळचा लातूरचा आहे. 

लातूर जिल्ह्यातील नांदुर्गा येथील रहिवासी असलेला कमलाकर बंडगर हा दिल्लीत सीबीआयचा वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी करत अनेकांना गंडा घालत होता. अनेक मोठे राजकीय नेते आणि उच्चपदस्थ सनदी अधिकारी आपले अत्यंत जवळचे मित्र असल्याचे तो सांगत असे. तसेच त्यांच्यामार्फत आपण कोणतेही काम करून देऊ शकतो, असे आमिष दाखवत बंडगरने अनेकांची फसवणूकही केली होती. बंडगरने अवैध कामे मिळविण्यासाठी कर्नाटकातील रवींद्र नाईक, दिल्लीतील मोहम्मद अजीझ खान, उत्तर प्रदेशातील अभिषेक बोरा आणि दिल्लीतील महेंद्र अरोरा यांना हाताशी धरत आंतरराज्यीय टोळी तयार केली. 

श्रीमंत सावज शोधून त्यांना आपल्या राजकीय तसेच पोलीस वर्तुळातील ओळखींचे हवाले देत राज्यसभेची खासदारकी वा राज्यपालपद देण्याचे आमिष ही टोळी दाखवत असे. त्यासाठी १०० कोटी रुपये मोबदला मागितला जात असे. या टोळीने पाच राज्यांमध्ये नेटवर्क प्रस्थापित केले होते. 

बंडगरच्या कारनाम्यांविषयी सीबीआयला खबर मिळाली होती. त्यामुळे त्याच्यावर सीबीआयने गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवली होती. त्याच्या फोनवरील संभाषणावरही सीबीआयचे लक्ष होते. बंडगर सातत्याने टोळीतील लोकांच्या संपर्कात असायचा. श्रीमंत लोकांना जाळ्यात ओढण्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा व्हायच्या. सीबाआय मुख्यालयात आपण वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगत बंडगर अनेकदा स्थानिक पोलीस ठाण्यांतही फोनवरून दमदाटी करत असे. या सगळ्याचे सज्जड पुरावे मिळाल्यानंतर सीबीआयने बंडगर आणि त्याच्या साथीदारांवर छापे टाकले. छाप्यांदरम्यान एकाची सीबीआय अधिकाऱ्यांशी झटापट झाली. त्यात तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. याप्रकरणी सीबीआय आणखी सहा आरोपींचा शोध घेत आहे.

टॅग्स :खासदारलाच प्रकरणगुन्हा अन्वेषण विभाग