पाच हजारांमध्ये, मिळणार रवींद्र नाट्यमंदिर; नाटकांचे जास्तीत जास्त प्रयोग होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 12:49 PM2023-05-17T12:49:52+5:302023-05-17T12:50:45+5:30
पु.ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांनी सांगितले की, मागील बऱ्याच दिवसांपासून यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. या निर्णयामुळे रवींद्र नाट्यमंदिरात भरपूर मराठी नाटके होतील.
मुंबई : नाट्यगृहांचे महागडे भाडे आणि नाटकांचे कमी होणारे बुकिंग यामुळे निर्मात्यांचे नुकसान टाळण्यासाठी सांस्कृतिक खात्याने दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता मराठी नाटकांच्या प्रयोगांसाठी रवींद्र नाट्यमंदिर केवळ पाच हजार रुपयांमध्ये मिळणार आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या घोषणेनुसार मंगळवारपासून (दि. १६) ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मराठी नाटकांसाठी रवींद्र नाट्यमंदिराचे भाडे केवळ ५ हजार रुपये करण्यात आल्याचे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद आहे.
कोरोना व त्यानंतरच्या काळात नाट्य क्षेत्राला झालेले नुकसान विचारात घेऊन नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी व मराठी नाट्य प्रयोगांची संख्या वाढावी यासाठी प्रभादेवीतील पु. ल. देशपाांडे महाराष्ट्र कला अकादमीतील रवींद्र नाट्यमंदिरात मराठी नाटकांसाठी सरसकट ५ हजार रुपये भाडे ठेवले जाणार आहे. विशेष बाब म्हणून शासन मान्यता देण्यात आली आहे. पु.ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांनी सांगितले की, मागील बऱ्याच दिवसांपासून यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. या निर्णयामुळे रवींद्र नाट्यमंदिरात भरपूर मराठी नाटके होतील.
आधी असे होते भाडे
एकूण ९११ आसनक्षमता असलेल्या रवींद्र नाट्यमंदिरामध्ये पूर्वी सोमवार ते शुक्रवार सकाळच्या प्रयोगासाठी ८,५०० रुपये, तर दुपार व संध्याकाळच्या प्रयोगांसाठी ९,५०० रुपये भाडे होते. शनिवार-रविवारसह सुट्ट्यांच्या दिवशी सकाळी ११,००० रुपये, तर दुपार व संध्याकाळी १३,००० रुपये भाडे होते. आजपासून जून ते सप्टेंबर या कालावधीसाठी बुकिंग अर्ज घेण्यात येणार आहेत.