पाच वर्षांत ४५० हून अधिक क्षयरुग्णांनी अर्ध्यावरच सोडले उपचार, पालिकेच्या शिवडी रुग्णालयातील बाब समोर
By स्नेहा मोरे | Published: August 25, 2022 08:17 PM2022-08-25T20:17:10+5:302022-08-25T20:17:27+5:30
मागील 2017 ते 2022 या दरम्यान 2 हजार 961 क्षय रुग्णांनी डामा घेतला आहे. तर 468 रुग्ण रुग्णालयातून पसार झाले आहेत.
स्नेहा मोरे
मुंबई - क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांर्गत क्षयमुक्तीसाठी विविध उपाययोजना यंत्रणा राबवित असतात. मात्र असे असूनही दुसरीकडे मागील पाच वर्षांत 468 क्षय रुग्णांनी अर्ध्यावरच उपचार सोडून दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर जवळपास तीन हजार रुग्णांनी वैद्यकीय सल्ला घेऊन डामाचा पर्याय निवडल्याचे समोर आले आहे.
मागील 2017 ते 2022 या दरम्यान 2 हजार 961 क्षय रुग्णांनी डामा घेतला आहे. तर 468 रुग्ण रुग्णालयातून पसार झाले आहेत. याविषयी, क्षय रुग्ण उपचार सोडून दिल्याची कारणे जाणून घेताना डॉक्टरांनी सांगितले, रुग्णालयातून पसार होणाऱ्या रुग्णांचा आजार हा गंभीर स्थितीत असतो. त्यामुळे अनेकानेक महिने या रुग्णांना रुग्णालयात विलगीकऱणात उपचार घ्यावे लागतात. परिणामी, रुग्ण रुग्णालयात न राहता घरचा रस्ता धरतात. तर दुसरीकडे एकलकोंडेपणामुळेही रुग्ण पसार होत असल्याचे दिसून आले आहे. रुग्णांनी अर्धवट उपचार सोडल्याने वा पसार झाल्याने या रुग्णांचा आजार बळावतो. शिवाय, रुग्णांचे कुटुंबीय व निकटवर्तीयांना आजाराचा संसर्ग होण्याची संभावना असते. बऱ्याचदा रुग्णांचे समुपदेशन करण्यात येते, जेणेकरुन त्यांनी अशा स्वरुपाची पावले उचलू नयेत.
रुग्णालयात उपचार मिळण्याऐवजी रुग्णालयातून वैद्यकीय सल्ला घेऊन निघून (DAMA) घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. 2017-18 मध्ये 461 रुग्णांनी दामा घेतला होता. 2018-19 मध्ये ही संख्या 853 पर्यंत वाढली. 2019-20 आणि 2020-21 मध्ये रुग्णांच्या संख्येत थोडीशी घट झाली होती, परंतु 2021-22 मध्ये ही संख्या पुन्हा वाढली. 2021-22 मध्ये डामा घेणाऱ्या रुग्णांची संख्या 538 वर पोहोचली आहे.
डामा घेणाऱ्यांमध्ये पुरुष आघाडीवर
2017 ते 2022 पर्यंत 2961 रुग्णांनी दवाखान्यातून डामा घेतला आहे. विशेष म्हणजे, बहुसंख्य DAMA रुग्ण हे पुरुष आहेत (63%). 2017 पासून आतापर्यंत 1873 पुरुष रुग्ण आणि 1088 महिलांनी डामा घेऊन रुग्णालयातून गेले आहेत.
अनेकदा अनेक रुग्णांना जास्त वेळ रुग्णालयात राहण्याची इच्छा नसते. घरी राहून उपचार मिळू शकतील असे त्यांना वाटते. त्यामुळे त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयातून डिस्चार्ज मिळतो, असे बीएमसीच्या संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले.
अनेकदा असे रुग्ण रुग्णालयातून पळून जातात ज्यांचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना सोडून जातात. रुग्णालयातून न सांगता पळून गेलेल्या रुग्णांबाबत, स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त, आता आम्ही स्वतः खात्री करतो की पळून गेलेला रुग्ण घरी पोहोचला आहे की नाही. आमच्या केंद्रांवर रुग्णाची नोंदणी झाली तर अधिकारी घरी जातात. घरी नसल्यास त्यांना कॉल करतो आणि खात्री करतो असे टीबी रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. नम्रता कौर यांनी सांगितले.