Join us

चेंबूरच्या डॉ.आंबेडकर उद्यानासमोर अखेर अशोक स्तंभ दिमाखात उभारणार

By मनोहर कुंभेजकर | Published: April 11, 2023 6:57 PM

खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई -  सार्वभौम आणि अखंड भारताचे राष्ट्रीय चिन्ह असणारा अशोक स्तंभ ही पूर्व उपनगरातील चेंबुरची नवी ओळख ठरणार आहे. चेंबूरच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर उभारण्यात येणाऱ्या अशोक स्तंभाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. शिवसेना लोकसभा गटनेते व खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे तेरा वर्षे प्रलंबित असलेल्या या अशोक स्तंभाच्या उभारणीच्या कामाला सुरुवात झाली असून खासदार शेवाळे यांच्या खासदार निधीतून हा स्तंभ उभारला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय सामाजिक न्याय ( राज्य) मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते दि,१३ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता या अशोक स्तंभाचे लोकार्पण होणार आहे. देशभरातील आंबेडकरी अनुयायांचे प्रेरणास्थान असलेल्या दादरच्या चैत्यभूमी येथे उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभाप्रमाणे, चेंबूरच्या डॉ. आंबेडकर उद्यान समोर देखील अशोक स्तंभ उभारावा, अशी स्थानिकांची आणि आंबेडकरी अनुयायांची मागणी होती. यानुसार सुमारे २००८ साली याठिकाणी अशोक स्तंभ उभारणीच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, काही कारणास्तव मागील १३ वर्षे हे काम रखडले. खासदार राहुल शेवाळे यांनी सरकारी यंत्रणांकडे पाठपुरावा करून अखेर हे काम पूर्णत्वास नेले.