गौरी टेंबकरमुंबई: मालाड पश्चिमच्या रेल्वे स्थानकासमोर दोन भाजी विक्रेत्यांमध्ये भाजी उतरवण्याच्या कारणावरून राडा झाला. हा प्रकार शुक्रवारी पहाटे घडला असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी बाप बेट्यावर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेत नोटीस बजावली आहे.
यातील फिर्यादी लोरिक यादव हे मालाड पूर्वच्या कुरार परिसरातील राहणारे असून भाजीचा व्यवसाय करतात. त्यांनी मालाड पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास आनंद रोड ,मालाड रेल्वे स्टेशन येथील एक्मे शॉपिंग सेंटर समोर त्यांच्या भाजीच्या गाड्या आल्या होता. त्यावेळी भाजी उतरवण्याच्या करणावरून त्यांचे अन्य भाजी विक्रेता शिवबादूर सिंग वय (६३) आणि त्याचा मुलगा मोंटू (३८) यांच्याशी त्यांचे भांडण झाले. त्यात आरोपीनी संगनमत करत लोरिक यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तर मोंटूने त्याच्या हातामध्ये भाजी कापण्याचा चाकू घेत तो फिर्यादीला दाखवला जो मुका आहे.
तर त्याचा भाऊ केतन याने ये चाकू तेरे पेट मे डाल के तेरी जान ले लूंगा असे बोलत लोरिक यादव यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानुसार मालाड पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३२३, ५०४,५०६(२) आणि ३४ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) अन्वये गुन्हा नोंद केल्याचे परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितले. याची माहिती मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र अडाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन्ही आरोपींना नोटीस देण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे अन्य अधिकाऱ्याने नमूद केले.