मुंबई : घाटकोपर येथील छेडानगर परिसरात पेट्रोलपंपावर होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आपत्कालीन मदतीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) कारागिरांची टीम धावून आली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी एमएमआरडीएने अत्याधुनिक उपकरणांसह सुमारे ६० जणांचे पथक घटनास्थळी पाठविले असून, त्यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.
छेडानगर येथे बचावासाठी विविध यंत्रणांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून, त्याला एमएमआरडीएनेही मदतीचा हात दिला आहे. मेट्रो ४ मार्गिकेच्या अमर महल साइटवरील ६० जणांचे पथक या घटनेत मदतकार्यात एमएमआरडीएने पाठविले. त्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य राबविण्यात प्रावीण्य असलेल्या २५ तज्ज्ञ कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे एमएमआरडीएकडून सांगितले जात आहे. त्याचबरोबर या बचावकार्यासाठी ४ हायड्रा क्रेन, ५०० मेट्रिक टन वजनाच्या २ क्रेन, ४ गॅस कटर यंत्रणेसह आवश्यक मशिनरी घटनास्थळी पाठविली आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.