"साहेब, मी माझ्या पत्नीची हत्या केली", पत्नीच्या हत्येनंतर आरोपीने गाठले पोलीस ठाणे
By मनीषा म्हात्रे | Published: March 14, 2023 06:42 PM2023-03-14T18:42:04+5:302023-03-14T19:38:59+5:30
घाटकोपरमध्ये किरकोळ वादातून घरातील चाकूने पत्नीवर वार करत तिची निर्घृण हत्या केली.
मुंबई : किरकोळ वादातून घरातील चाकूने पत्नीवर वार करत तिची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर रक्ताने माखलेल्या अवस्थेतच आरोपीने घाटकोपर पोलीस ठाणे गाठले. साहेब, मी माझ्या पत्नीची हत्या केल्याचे सांगताच, पोलिसांनी त्याच्या घरी धाव घेत पत्नीचा मृतदेह शववच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविला आहे. याप्रकरणी घाटकोपरपोलिसांनी संतोष मुरलीधर मिस्त्री (३९) याला अटक केली आहे. त्याने भारतीय सैन्य दलात दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर, तो एक जिम मध्ये नोकरीला होता.
घाटकोपर येथील असल्फा भाजी मार्केटमधील साराभाई चाळ रूम नंबर ३ मध्ये ही घटना घडली. नमिता संतोष मिस्त्री (३८) असे मृत महिलेचे नाव आहे. दोघांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण होत असल्याने दोघांमध्ये खटके उडत होते. मंगळवारी सकाळी ६ वाजता मिस्त्री घरी आला. त्यामुळे दोघांमध्ये बाचबाची झाली. याच वादातून मिस्त्रिने घरातील चाकूने तिच्या मानेवर, गळ्यावर वार करत तिची निर्घृण हत्या केली.
हत्येनंतर रक्ताने माखलेल्या अवस्थेत त्याने पोलीस ठाणे गाठून हत्येची कबुली दिली. पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत नमिताला राजावडी रूग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वी तिला मृत घोषित करण्यात आले. या घटनेने परीसरात खळबळ उडाली. पोलिसांनी मिस्त्रिला हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे. तो नमिता, आई आणि पहिल्या पत्नीच्या मुलासोबत येथे राहण्यास आहे. ही त्याची तिसरी पत्नी असल्याची माहिती समजते आहे.