गोरेगावमध्ये बॅलेट मतदानासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मनस्ताप
By रेश्मा शिवडेकर | Published: May 12, 2024 03:39 PM2024-05-12T15:39:24+5:302024-05-12T15:39:35+5:30
मतदान केंद्रावर कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने मतदानाला उशीर, एकाचवेळी दोन ठिकाणी नियुक्ती दिल्याची तक्रार
मुंबई - गोरेगावच्या दिंडोशी येथील मतदान केंद्रावर कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने रविवारी बॅलेट मतदानाला आलेल्या शिक्षक व इतर सरकारी कर्मचाऱ्यांना खूप मनस्ताप झाला. सकाळी नऊ वाजल्यापासून मतदान केंद्रावर मतदान करण्याकरिता हजर झालेल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी दुपारी बारा वाजेपर्यंत ताटकळावे लागले.
गोरेगावच्या दिंडोशी येथील पशू वैद्यकीय महाविद्यालयात निवडणुकीचे प्रशिक्षण आणि बॅलेट मतदान होणार होते. मात्र नियोजनाअभावी येथे जमलेल्या शिक्षक व इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये रविवारी सकाळी गोंधळाचे वातावरण होते. मुंबईमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले शिक्षक व इतर राज्य सरकारी कर्मचारी याचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे. परंतु अनेकांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आल्याची तक्रार आहे.
येथे आलेल्या कर्मचारी वर्गाचे नियोजन करताना मतदान केंद्रावरील कर्मचाऱयांना तारेवरची कसरत करावी लागली. नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी फोनवर संदेश देऊन बोलवण्यात आले होते. परंतु, या गोंधळामुळे कर्मचारी त्रासून गेले. त्यामुळे दिंडोशी मतदारसंघातील केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण होते.