लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचाव यात्रेला गुरुवारी मुंबईतील चैत्यभूमीवरून सुरुवात झाली. आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वीर भाई कोतवाल यांना अभिवादन करून यात्रेला सुरुवात केली. त्यानंतर ही यात्रा पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे पाेहोचली. तिथून सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ असलेल्या नायगाव, सातारा येथून रात्री कोल्हापूरमध्ये मुक्कामी पोहोचली.
यात्रा पुणे येथे पोहोचल्यानंतर आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शरद पवार यांनी मध्यंतरी म्हटले होते की, आम्ही समाजाचे २२५ आमदार निवडून आणू. त्यानंतर ओबीसींमध्ये चलबिचल निर्माण झाली. यातून एका समूहाची सत्ता आणायचा प्रयत्न असल्याचे दिसते. तसेच ओबीसींचे आरक्षण कायमस्वरूपी स्थगित करण्याचा डाव आहे. पवारांनी समाज हा शब्द वापरल्यामुळे वातावरण चिघळले आहे.
ओबीसींनी स्वत:चे १०० आमदार निवडून आणावेत, तरच आपल्याला ओबीसी आरक्षण वाचवता येईल. एससी आणि एसटी यांचे आरक्षण संविधानिक आहे. तसेच ओबीसी आरक्षण संविधानिक झाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.