Join us

हिंदीमध्ये मराठी दिग्दर्शकांचा बोलबाला, 'आर्टिकल ३७०'नंतर 'योद्धा'ने वेधले लक्ष

By संजय घावरे | Published: March 16, 2024 7:27 PM

हिंदी सिनेसृष्टीच्या जडणघडणीत मराठी दिग्दर्शकांचे मोलाचे योगदान आहे.

मुंबई - मागील काही वर्षांपासून तरुण मराठी दिग्दर्शक पुन्हा हिंदी सिनेसृष्टी गाजवत आहेत. मागच्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'आर्टिकल ३७०' या चित्रपटानंतर मराठी तरुणाने दिग्दर्शित केलेला करण जोहर निर्मित 'योद्धा' प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

हिंदी सिनेसृष्टीच्या जडणघडणीत मराठी दिग्दर्शकांचे मोलाचे योगदान आहे. महेश मांजरेकर, आशुतोष गोवारीकर, अजय फणसेकरांपासून आजच्या काळातील रवी जाधव, लक्ष्मण उतेकर, आदित्य सरपोतदार, ओम राऊत, समीर विद्वांस, नागराज मंजुळे, अविनाश अरुण, निपुण धर्माधिकारी, सचिन कुंडलकर असे बरेच दिग्दर्शक हिंदीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. भारताच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय असलेल्या 'आर्टिकल ३७०'वर सिनेमा बनवण्याचे धाडस आदित्य जांभळे या गोव्यातील तरुण दिग्दर्शकाने केले. 'उरी' फेम आदित्य धरने निर्मितीची जबाबदारी सांभाळत त्याच्यावर विश्वास दाखवला. करण जोहरच्या धर्मा प्रॅाडक्शनची निर्मिती असलेला 'योद्धा' बऱ्याचदा हुलकावणी दिल्यानंतर रिलीज झाला आहे. याचे दिग्दर्शन मराठमोळ्या सागर आंब्रेने पुष्कर झासोबत केले आहे. या चित्रपटाला समीक्षकांसोबतच प्रेक्षकांचीही पसंती मिळत आहे. 

मराठी दिग्दर्शकांच्या हिंदीतील कामगिरीबाबत 'लोकमत'शी बोलताना आदित्य जांभळे म्हणाला की, मराठी तरुण दिग्दर्शकांना हिंदीमध्ये खूप वाव मिळत आहे. त्यांच्या कलागुणांवर विश्वास दाखवत त्यांना संधी दिली जात असल्याचा आनंद आहे. मी यापूर्वी बनवलेल्या लघुपटांना देश-विदेशांतील पुरस्कार मिळाले आहेत. त्यानंतर आदित्य धरने दिलेल्या संधीमुळे 'आर्टिकल ३७०' सारखा महत्त्वाचा विषय यशस्वीपणे सिनेमात दाखवू शकल्याचेही आदित्य म्हणाला.- महेश मांजरेकर (अभिनेते, दिग्दर्शक)

मराठीत टॅलेंटची कमतरता कधीच नव्हती. मराठी दिग्दर्शकांकडे टॅलेंट असल्याने हिंदीवाले संधी देत आहेत. दाक्षिणात्य अॅटलीने कधीच हिंदीचा विचार केला नाही. त्याने स्वत:ला सिद्ध केल्याने शाहरुख खानने त्याला ३०० कोटींचा सिनेमा देण्याचे धाडस केले. मराठीच्या बाबतीतही हे होईल. कारण टॅलेंटबाबतीत आपण कुठेही कमी नाही.

'उलाढाल', 'क्लासमेट्स' फेम आदित्य सरपोतदार निर्माते रॅानी स्क्रूवालांच्या 'काकुडा'च्या दिग्दर्शनात बिझी आहे. यात सोनाक्षी सिन्हा आणि रितेश देशमुख आहेत.

सिनेमॅटोग्राफर-दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर 'छावा'मध्ये छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांची जीवनगाथा सांगणार आहे. यात विकी कौशल शीर्षक भूमिकेत आहे. 

नागराज मंजुळे एकीकडे 'खाशाबा' या मराठी चित्रपटात बिझी आहे, तर दुसरीकडे उत्कंठा वाढवणाऱ्या 'मटका किंग' या हिंदी चित्रपटावरही काम करत आहे. 

हिंदीत एन्ट्री करणाऱ्या परेश मोकाशीच्या 'भयकथा हीर रांझा की' चित्रपटाची प्रतीक्षा आहे. 'महात्मा' या मराठी सिनेमात बिझी असलेल्या समीर विद्वांसची हिंदीतही बोलणी सुरू आहेत. 'मैं अटल हूं'नंतर रवी जाधवही हिंदीत काहीतरी वेगळे करेल.