जुलैमध्ये सव्वा कोटी प्रवासी विमानाने ‘भुर्रर्र..’; २५ टक्के प्रवासी वाढ, इंडिगो ठरले अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 06:33 AM2023-08-17T06:33:34+5:302023-08-17T06:34:46+5:30
टाटा समूहाच्या एअर इंडिया विमानाने किती प्रवाशांनी प्रवास केला?
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विमान प्रवास करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत महिन्याकाठी सातत्यपूर्ण वाढ होत असून, नुकत्याच सरलेल्या जुलै महिन्यात देशात तब्बल १ कोटी २१ लाख लोकांनी विमान प्रवास केल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात देशात एकूण ९७ लाख ५ लाख लोकांनी विमान प्रवास केला होता. त्या तुलनेत यंदाच्या वर्षी जुलै महिन्यात प्रवासी संख्येत तब्बल २५ टक्के वाढ झाली आहे. नागरी विमान महासंचालनालयाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
गेल्या काही महिन्यांप्रमाणेच यावेळी देखील ‘इंडिगो विमान कंपनी’ने आपला अव्वल क्रमांक कायम राखला आहे. जुलैत एकूण प्रवाशांमधील ७६ लाख ७५ हजार लोकांनी इंडिगोला पसंती दिली आहे.
- टाटा समूहाच्या एअर इंडिया कंपनीच्या विमानाने एकूण ११ लाख ९८ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे.
- टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्स यांच्या विस्तारा कंपनीने १० लाख २० हजार प्रवाशांना विमान सेवेची अनुभूती दिली.
- एअर एशिया कंपनीच्या विमानाने एकूण ९ लाख प्रवाशांनी प्रवास केला.
- ७ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण केलेल्या अकासा एअर कंपनीच्या विमानातून ६ लाख २४ हजार प्रवाशांनी प्रवास केला.
- स्पाईस जेट कंपनीच्या विमानाने एकूण ५ लाख ४ हजार प्रवाशांनी प्रवास केला.