Join us  

गृहखरेदीची विक्रमी ‘अष्टमी’; अवघ्या आठ महिन्यांत ८१ हजार मुंबईकरांनी घेतले हक्काचे घर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 6:40 AM

यात घरे व व्यावसायिक कार्यालये अशा दोन्ही प्रकारांचा समावेश आहे.

- मनोज गडनीसमुंबई : मायानगरी मुंबईबाबतचे आकर्षण आजही कायम असून, चालू वर्षात मुंबईत आतापर्यंत एकूण ८१ हजार ६६४ मालमत्तांची विक्री झाली आहे. २०२२ या वर्षामध्ये मुंबईत एकूण १ लाख २१ हजार मालमत्तांची विक्री झाली होती. मात्र, त्या तुलनेत अवघ्या आठ महिन्यांत झालेली ८१ हजारांपेक्षा जास्त मालमत्तांच्या विक्रीची संख्या लक्षात घेता चालू वर्षात मुंबईत मालमत्ता विक्रीचा उच्चांक गाठला जाण्याचे संकेत मिळत आहेत. 

यात घरे व व्यावसायिक कार्यालये अशा दोन्ही प्रकारांचा समावेश आहे. मात्र, घरांच्या विक्रीचे प्रमाण हे ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. २०२२ मध्ये मुंबईत झालेल्या घरांच्या विक्रीपैकी सर्वाधिक घरांची विक्री ही पश्चिम उपनगरात झाली. ज्या घरांचे आकारमान ५०० ते एक हजार चौरस फूट आहे व ज्यांची किंमत १ ते २ कोटी रुपयांच्या दरम्यान आहे, अशा घरांना ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून आले. तर, एक हजार चौरस फुटांपेक्षा जास्त जागांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण १६ टक्के होते. २०२३ मध्येदेखील दोन बीएचके किंवा त्यावरील घरांच्या खरेदीलाच ग्राहकांनी पसंती दिल्याचे दिसते. किमान ५०० ते एक हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. 

व्याजदरवाढीचा फटका नाही?मे २०२२ पासून आतापर्यंत व्याजदरामध्ये अडीच टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, ज्या प्रमाणात मुंबई शहरात मालमत्तांची विक्री होत आहे, ते पाहता व्याजदरवाढ व्यवस्थेत सामावली गेली का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

विक्रीच्या वाढीमागचे कारण काय?मुंबई शहरात काही प्रमाणात मार्गी लागलेली विकासकामे याचा फायदा विकासकांना झाला आहे. विशेषतः मुंबई उपनगरामध्ये दोन मेट्रो सेवा सुरू झाल्या आहेत. यामुळे पश्चिम उपनगराकडे ग्राहकांचा ओढा असल्याचे दिसून येते. 

सणासुदीचा फायदागेल्या सलग तीन महिन्यांत मुंबईत १० हजारांपेक्षा जास्त मालमत्तांची विक्री झाली आहे. आगामी काळात असलेले सणासुदीचे दिवस लक्षात घेता अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बिल्डर मंडळीतर्फे आकर्षक योजना आखल्या जातील आणि याची परिणती मालमत्तांची विक्री अधिक होण्याच्या रूपाने दिसेल.

मुंबईला मागणी, महामुंबई मात्र थंडमहामुंबई परिसरात मात्र गृहनिर्माणाला फारशी चालना नसल्याचे दिसून येते. महामुंबई परिसरात आजच्या घडीला तब्बल ८ लाख घरे विक्रीविना पडून आहेत. चालू आर्थिक वर्षात महामुंबई परिसरात आतापर्यंत केवळ ३३ हजार ७१४ घरांचीच विक्री झाली आहे. तर, नव्या प्रकल्पांची संख्या गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत २० टक्क्यांनी घटली आहे. 

सरकारी तिजोरीलाही फायदामालमत्ता विक्रीच्या वाढत्या आकड्यामुळे सरकारी तिजोरीतही मोठ्या प्रमाणावर महसूल जमा होत आहे. आतापर्यंत झालेल्या विक्रीच्या माध्यमातून तिजोरीत ७,०५५ कोटी रुपये जमा झाले आहेत. 

टॅग्स :सुंदर गृहनियोजनमुंबई