खोताच्या वाडीत जेष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, मनोरंजनाचं सर्व सुविधा उपलब्ध

By सीमा महांगडे | Published: March 8, 2024 05:10 PM2024-03-08T17:10:01+5:302024-03-08T17:10:42+5:30

मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

In Khota Wadi, there is a recreation center for the elderly, all facilities of entertainment are available | खोताच्या वाडीत जेष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, मनोरंजनाचं सर्व सुविधा उपलब्ध

खोताच्या वाडीत जेष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, मनोरंजनाचं सर्व सुविधा उपलब्ध

मुंबई - ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा, त्यांचे जीवन सुसह्य करण्याच्या दृष्टीने महापालिका विविध उपाययोजना करत आहेत. त्यानुसार मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी धोरण तयार करण्यात आले असून त्यातील एक प्रशस्त विरंगुळा केंद्र गिरगावात खोताची वाडी परिसरात सुरू करण्यात आले आहे. याचे लोकार्पण गुरुवारी पालमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी जेष्ठ नागरिकांसोबत कॅरम खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी पालिकेच्या नियोजन विभागाच्या संचालिका डॉ. प्राची जांभेकर, डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे उपस्थित होते.

एकटेपणातून बाहेर पडून इतर ज्येष्ठ नागरिकांसोबत आनंदाने वेळ घालवणे, हा पालिकेमार्फत स्थापन केल्या जाणाऱ्या या विरंगुळा केंद्राचा उद्देश आहे. दरम्यान खोताची वाडी परिसरात वय ६० वर्ष आणि त्यावरील वयोगटातील महिला व पुरूषांसाठी जवळपास २ हजार चौरस फूट एवढ्या प्रशस्त जागेत हे विरंगुळा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या विरंगुळा केंद्रात विश्रांती घेण्यासह कॅरम - बुद्धिबळ सारखे बैठे खेळ, वाचनासाठी पुस्तके - मासिके, मनोरंजनासाठी दूरदर्शनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकाच वेळी सुमारे ४० ज्येष्ठ नागरिक या विरंगुळा केंद्रात विश्रांती करू शकणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे जेष्ठांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. प्राथमिक स्तरावर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत विरंगुळा केंद्र सुरू राहणार असून ज्येष्ठांच्या प्रतिसादानुसार वेळेत बदल करण्यात येणार आहे.  

सात परिमंडळात केंद्र सुरु करणार

यासाठी धोरण तयार करण्यात आले असून त्याअंगतर्गत सात परिमंडळांमध्ये प्रत्येक एक अशी एकूण सात विरंगुळा केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. यासाठी पालिकेने अर्थसंकल्पात १०० कोटीची तरतूद केली आहे. प्रशासनामार्फत ज्येष्ठांना त्यांच्या उर्वरित आयुष्यात सुरक्षित आणि आरोग्य सुविधायुक्त वातावरण देण्यासाठी विरंगुळा केंद्र उपयोगी ठरणार आहेत. न्यूयॉर्कमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे चालवली जातात. त्याच धर्तीवर मुंबईत अशी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. उर्वरित आयुष्यातील काही क्षण निवांत घालवता यावेत, आयुष्य सुखकर व्हावे आणि आनंद घेता यावा यासाठी विरंगुळा केंद्रे ज्येष्ठांसाठी आधार ठरणार आहे.

Web Title: In Khota Wadi, there is a recreation center for the elderly, all facilities of entertainment are available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई