मुंबई : मुंबईकरांना मालमत्ता कर वसुलीसाठी शेवटचे पाच दिवस राहिले आहेत. यासाठी पालिकेने २४ वॉर्डातील नागरी सुविधा केंद्रे कार्यान्वित केली असून ते ३१ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत कार्यरत असणार आहे. करवसुलीचे उद्दिष्ट वेळेत गाठण्यासाठी पालिकेची धडपड सुरू आहे.
एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत साडेचार हजार कोटी रुपये मालमत्ता करवसुलीचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. थकबाकीपोटी पालिकेच्या तिजोरीत आधीच ७०२ कोटी रुपये जमा झाले होते. २६ फेब्रुवारीपासून नवीन देयके पाठवल्यापासून ते आत्तापर्यंत त्यात ७५० कोटीहून अधिक रुपयांची भर पडली आहे. उद्दिष्ट गाठण्यासाठी अधिकारी कार्यरत असणार आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरांमधील मालमत्ताधारकांना निर्धारित कालावधीत मालमत्तेचा करभरणा करता यावा, यासाठी साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुट्टीदिवशीही अधिकारी २४ प्रशासकीय विभागांत कार्यरत राहणार आहेत.
सुट्टीदिवशी मुभा -
मार्चच्या शेवटच्या आठवड्यातील साप्ताहिक आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
इथेही सुविधा मिळणार -
१) २७ ते ३० मार्चदरम्यान पालिका मुख्यालयासह सर्व २४ प्रशासकीय विभागांमधील नागरी सुविधा केंद्र तसेच तुंगा व्हिलेज (एल विभाग), कांजूरमार्ग (पूर्व) येथील लोढा संकुल इमारत (एस विभाग) आणि पी / पूर्व विभाग येथील नवीन नागरी सुविधा केंद्र आदी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
२) ३१ मार्च रोजी सर्व नागरी सुविधा केंद्रे सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहतील.