मार्चमध्येच पारा गेला ४० अंशांवर; होळीवर जाणवेल उष्णतेचा दाह
By सचिन लुंगसे | Published: March 23, 2024 05:43 PM2024-03-23T17:43:07+5:302024-03-23T17:44:16+5:30
यंदाच्या होळीवर उष्णतेचा दाह जाणवेल, असा इशारा हवामान अभ्यासकांनी दिला आहे.
मुंबई : तापमानातील वाढ १९७० सालापासून सातत्याने नोंदवली जात आहे. १९७० मध्ये महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि बिहार या तीन राज्यांत मार्च महिन्यात तापमानातील वाढ थेट ४० अंश सेल्सिअसवर नोंदवली गेली. १९७० ते २०२४ या वर्षात तापमानवाढीत कधीच घसरण झाली नाही. याउलट राजस्थान, गुजरात, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा पाराही वाढला असून, आता होळी साजरी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. तरी यंदाच्या होळीवर उष्णतेचा दाह जाणवेल, असा इशारा हवामान अभ्यासकांनी दिला आहे.
१ जानेवारी १९७० ते ३१ डिसेंबर २०२३ या कालखंडातील रोजचे तापमान आणि या वर्षातील प्रत्येक महिन्यातील सरासरी तापमानाची माहिती मिळवण्यासाठी भारतीय हवामान केंद्र आणि उपग्रहांची मदत घेतली गेली. भारतीय हवामान केंद्रातून तापमानवाढ नोंदणीसाठी आकाशात एका विशिष्ट पद्धतीने फुगे सोडले जातात. या पद्धतीतून नोंदवले जाणारे तापमान, उपग्रहातून मिळणाऱ्या प्रतिमा यातून काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली गेली. शिवाय बदलत्या तापमानवाढीची माहिती काढण्यासाठी १९९१ ते २०२० या वर्षादरम्यान गोळा केलेल्या माहितीचा उपयोग केला गेला आहे.
मार्च महिना जास्त उष्णतेचा महिना
पूर्वी मार्च महिन्यात उष्णतेच्या झळा अभावाने दिसून यायच्या. सद्य:स्थितीत जगभरात होणारी तापमान वाढ, वाढत्या उष्णतेच्या लहरी, सतत वाढणारे तापमान हा घटनाक्रम सातत्याने दिसून येत आहे. यंदाच्या मार्च महिन्यातही हीच परिस्थिती आहे. भविष्यात मार्च महिना जास्त उष्णतेचा महिना म्हणून नोंदवला जाईल.
- महेश पलावत, उपाध्यक्ष, क्लायमेट चेंज
- भारतात मार्च आणि एप्रिल महिन्यात उष्णता जाणवते.
- मार्च महिना सुरू झाला की देशातील उत्तर आणि पश्चिमेकडील पट्ट्यातील उष्णतेत वाढ दिसून येते.
- १९७० पासून जम्मू आणि काश्मीर येथे २.८ अंशांनी तापमानात वाढ झाल्याची नोंद आहे.
- जम्मू आणि काश्मीर येथे होणारी तापमानवाढ वेगाने होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
- १९७० पासून मिझोरम राज्यात १.९अंश सेल्सिअसने झालेला तापमानवाढीचा फटका दिसून येत आहे.
नागपूरलाही तापमानवाढीची झळ
देशभरातील ५१ प्रमुख शहरांमध्ये तापमानवाढीमुळे आरोग्य समस्या उद्भवल्या आहेत. ५१ शहरांपैकी ३७ शहरांमध्ये ४० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचले आहे. बिलासपूर, नागपूर, भिलाई, कोटा, रायपूर, मदुराई, जोधपूर, जबलपूर, भोपाळ, वडोदरा, वाराणसी, ग्वालियर, मिर्झापूर, प्रयागराज, आणि इंदूर या शहरांमध्ये मार्च महिन्याच्या अखेरीस तापमानवाढीची झळ बसते आहे.