मुंबई - संगीत आणि निसर्ग यांचे एक अनामिक नाते आहे. त्यामुळेच बदलणाऱ्या ऋतूंप्रमाणे संगीताचे सूरही आळवले जातात. मान्सूनचे औचित्य साधत वरुळीतील नेहरू सेंटरमध्ये 'मेघ मल्हार'चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.
पावसाने आता आपले वेगवेगळे रूप दाखवणे सुरू केले आहे. वाऱ्याबरोबर तो बेफाम बरसतो आहे. पावसाचे संततदार बरसने आता मुंबईकरांना नेहमीच झाले आहे. रिमझिम म्हणावा अशी ही त्याची झलक अधून मधून पाहायला मिळते आहे. त्यामुळे हवेत थोडाफार गारवा आलेला आहे. निसर्गातल्या हिरवाईने प्रसन्न असे वातावरण निर्माण झाले आहे. अशा स्थितीत शास्त्रीय संगीताचा अनुभव जर प्रेक्षकांना मिळाला तर तो हवा असतो.
वरळीच्या नेहरू सेंटरच्या वतीने प्रत्येक वर्षी 'मेघ मल्हार' हा उपक्रम राबवला जातो. शास्त्रीय संगीताच्या या उपक्रमात राष्ट्रीय पातळीवरील शास्त्रीय संगीतातील नावाजलेले दिग्गज कला सादर करतात. यंदा पं. कुमार गंधर्व आणि पं. राम मराठे यांच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या हेतूने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रक्ताच्या नात्यातून शिष्यत्व जपलेल्या कुटुंब सदस्यांना या 'मेघ मल्हार' कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. १९ आणि २० जुलैला नेहरू सेंटरच्या सभागृहात संध्याकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
पहिल्या दिवशी पं. कुमार गंधर्व यांचे नातू भुवनेश कोमकली आणि कन्या पंडिता कलापिनी कोमकली पं. कुमार गंधर्वांना स्वरांजली वाहतील. दुसऱ्या दिवशी पं. राम मराठे यांची नात स्वरांगी मराठे-काळे आणि नातू भाग्येश मराठे आपल्या आजोबांना सूरांजली अर्पण करतील. ही स्वरधारा प्रेक्षकांना 'मेघ मल्हार'चा आनंद देईल. मंगला खाडिलकर या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका नेहरू सेंटर नाट्यगृहाच्या तिकीट काउंटरवर उपलब्ध आहेत.