मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य ज्या म्हाडा लॉटरीची प्रतिक्षा करत होते, ती लॉटरी अखेर २२ मे रोजी निघाली आहे. २०१८ नंतर म्हाडाची ही सर्वात मोठी लॉटरी आहे. मुंबईतील विविध योजनेतंर्गत म्हाडाने यंदा ४ हजार ८३ घरांसाठी जाहिरात काढली आहे. जुलै २०२३ मध्ये म्हाडाच्या घराची ऑनलाईन सोडत निघणार आहे. २२ मे ते २६ जून पर्यंत म्हाडा घरांसाठी अर्ज करता येणार आहेत. परंतु म्हाडा लॉटरीमधील घरांची किंमत ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे दिसून येते.
सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी म्हाडा लॉटरी काढते. परंतु यंदाच्या लॉटरीत सर्वात कमी घराची किंमत ही २५ लाख रुपये आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील हे घर चांदिवली परिसरात असून त्यासाठी अनामत रक्कम २५,५९० रुपये भरावी लागणार आहे. त्यापाठोपाठ मानखुर्द येथे अत्यल्प उत्पन्न गटातील घरासाठी २७ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. म्हाडाच्या घराची किंमत आता कोट्यवधींच्या घरात पोहचली आहे. मुंबईच्या पवई परिसरातील म्हाडा घरासाठी १ कोटी ९८ लाख रुपये भरावे लागणार आहेत.
त्याचसोबत म्हाडाला विकासकाकडून प्राप्त झालेल्या सदनिका यांचाही लॉटरीत समावेश आहे. या सदनिकांच्या किंमतीत सेवाशुल्क आकार, मालमत्ता कर, विद्युत देयके यांचा समावेश करण्यात आला नाही. म्हाडाच्या सर्वात महागड्या घरांची किंमत ऐकून सर्वसामान्यांना चक्कर आल्याशिवाय राहणार नाही. दादर, ताडदेव, लोअर परेळ, भायखळा या भागात ही घरे आहेत. त्यातील सर्वात महागड्या घराची किंमत जवळपास साडे सात कोटी इतकी आहे.
ताडदेव येथील क्रिसेट टॉवर येथील उच्च उत्पन्न गटातील घराची किंमत ७,५७,९४,२६८ रुपये इतकी आहे तर त्यासाठी म्हाडाला अनामत रक्कम म्हणून १,५०,५९० रुपये भरावे लागणार आहेत. त्याचठिकाणी १४१.३० स्क्वेअर मी. घराची किंमत ७,५२,६१,६३१ रुपये आहे. तसेच आनंद हाईटस, शेख मिस्त्री रोड, अँन्टॉप हिल, वडाळा, मुंबई येथील उच्च उत्पन्न गटातील घराची किंमत ४.१०,९४,०३९ रुपये आहे. दादर नायगाव डिव्हीजन, प्लॉट नं.१ शिवडी वडाळा इस्टेट, कात्रक रोड, वडाळा (प) येथील घराची किंमत ३,६९,३८,९३६ रुपये आहे.