मीरारोडच्या नया नगरमध्ये रमजानचा बंदोबस्त आणि व्यवस्थेमुळे नागरिकांना कोंडीतून दिलासा
By धीरज परब | Published: March 30, 2023 08:11 PM2023-03-30T20:11:44+5:302023-03-30T20:11:53+5:30
वाहनांची वर्दळ त्यातच बेशिस्त हातगाड्या व बाकडे तसेच बेशिस्त पार्किंग आदी मुळे या ठिकाणी कोंडी होऊन लोकांना त्रास होतो .
मीरारोड - मीरारोडचा नया नगर परिसर हा मुस्लिम बहुल वस्तीचा असून यंदा रमजान च्या सुरवाती पासूनच पोलिसांनी काही भागात वाहनांना प्रवेश बंद, फेरीवाल्याना आखून दिलेली शिस्त आदी कारणांनी दरवर्षी होणारी कोंडी दिसत नाही.
नयानगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये येत असलेल्या निहाल कॉर्नर, नरेंद्र पार्क, लोढा रोड, निलम पार्क, एन. एच. स्कुल सर्कल, गितानगर फेज- २, हैदरी चौक या ठिकाणी रमजान सणामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते . रमजान मध्ये तर ह्या भागात उत्सवाचे वातावरण असते . विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांसह , फळ - भाज्या , कपडे तसेच अन्य खरेदी साठी लोकं मोठ्या संख्येने येतात . शिवाय मशिदीत नमाज साठी येणारे व जाणाऱ्यांची गर्दी होते . लोकांची गर्दी असल्याने फेरीवाले , बाकडेवाले तसेच अनेक दुकानवाले देखील रस्त्यावर आपला व्यवसाय मांडतात .
वाहनांची वर्दळ त्यातच बेशिस्त हातगाड्या व बाकडे तसेच बेशिस्त पार्किंग आदी मुळे या ठिकाणी कोंडी होऊन लोकांना त्रास होतो . वाहन चालकांना सुद्धा ये - जा करणे अवघड होते . शिवाय लहान सहान कारणांनी भांडणे होतात . कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असते . तर येथील हातगाड्या , दुकाने सुद्धा रात्री उशिरा पर्यंत खुली असायची .
तसा अनुभव गेल्या वर्षी रमजानच्या पहिल्या काही दिवसात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना आला . नागरिकांनी देखील आपल्या समस्या मांडत उपाययोजना करण्याची मागणी केली . त्यामुळे यंदा रमजानच्या सुरवाती पासूनच पोलिसांनी खरेदी व विक्रीसाठी येणा-या मुस्लिम बांधवांची तसेच इतर नागरीकांच्या सोयी सुविधेचा व सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार केला . अपघात व वाहतुक कोंडी टाळण्याच्या दृष्टीने एन. एच. हायस्कुल सर्कल नाका, निहाल कॉर्नर नाका, निलम पार्क नाका, हैदरी चौक येथे रस्त्यांवर बॅरीकेटींग करुन अत्यावश्यक सेवेतील वाहने व दुचाकी वाहने वगळता इतर सर्व वाहनांना प्रवेशास प्रतिबंध केला आहे . २१ एप्रिल पर्यंत दुपारी ४ ते रात्रौ १२ वाजे पर्यंत हे प्रतिबंध लागू असणार असल्याचे अधिसूचने द्वारे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी जाहीर केले आहे .
रिक्षा , चारचाकी व अवजड वाहनांना बंदी घातली असली तरी स्थानिक नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहने उभी करण्यासाठी एन. एच. स्कुलचे ग्राऊंड, महापालिका सभागृहाचे समोर , शम्स हॉल समोरील बंद रस्त्यावर व निलम पार्क ते टिपु सुलतान मार्ग कडे रस्त्याच्या दोन्ही बाजुस व्यवस्था पोलिसांनी केली आहे . बंदोबस्त साठी ८ पोलीस अधिकारी , २३ अंमलदार , ४ होमगार्ड , २१ महिला सुरक्षा बल जवान व १ दंगल नियंत्रण पथक ह्या परिसरात तैनात आहे.
महापालिकेचे फेरीवाला पथक व सुरक्षा बल चे जवान असले तरी ते मात्र सातत्याने परिसरात फिरताना दिसले नाही . त्यामुळे फेरीवाले व बाकडेवाले दिलेल्या रेषेच्या बाहेर व्यवसाय करत असल्याचे आढळले . वाहतूक पोलीस सुद्धा बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यास फिरत नसल्याचे दिसले . त्यामुळे वरिष्ठ निरीक्षक वनकोटी व पोलीसांवरच फेरीवाले , बाकडेवाले, बेशिस्त वाहने उभी करणाऱ्या वाहन चालकांना शिस्ती लावण्याची पाळी आली आहे . पोलिसांनी रस्ते मोकळे करून शिस्तीचा बडगा उगारल्याने गर्दी टळून पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे .